ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीचे आरोग्य महत्वाचे – हर्षवर्धन पाटील

👉 शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न व साखर उतारा देणाऱ्या जातींची लागवड करावी.
-कळसला मधुकर खर्चे यांच्या ऊस प्रक्षेत्रास भेट
इंदापूर : प्रतिनिधी दि.11/1/23
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जमीनीचे व पिकाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दुर्लक्ष न करता सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, परिणामी, शेतकऱ्यांना ऊस पिकाचे अपेक्षित उत्पादन सहजपणे घेता येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कळस येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी मधुकर खर्चे यांच्या ऊस प्रक्षेत्रास हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.10) भेट दिली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या ऊस जातींची लागवड करावी, त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व ऊस संशोधन केंद्रे व मधुकर खर्चे सारखे प्रयोगशील तज्ञ शेतकरी मार्गदर्शन करतील. इंदापूर तालुक्यात उजनी बॅक वॉटर, नीरा व भिमेवरील बंधारे, शेटफळ तलाव, भाटघर व खडकवासल्याचे पाणी आदी सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यात 40 ते 42 लाख मे. टन ऊस उत्पादन आगामी काळात होणार आहे. ऊस पिकातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल. तसेच पाण्याच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होण्याचा धोका असल्याने, उजनी बॅकवॉटर क्षेत्रात ठिबकचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर करावा, ऊस पिकाचे निरीक्षण करून पिकास कोणत्या खताची गरज आहे, हे ठरविता येते,असे याप्रसंगी बोलताना मधुकर खर्चे यांनी सांगितले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांची ऊस शेतीची पाहणी केली. त्यांना मधुकर खर्चे व निलेश खर्चे यांनी माहिती दिली. याप्रसंगी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याचे संचालक उपस्थित होते. आभार बाबा महाराज खारतोडे यांनी मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here