सरकारचे टेन्शन वाढले: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, उपोषण मंडपातच सलाईनवर.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे.
मात्र, तरीही ते आपल्या निर्धारावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे. तर त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांना टेन्शन आलं आहे. सरकारने जरांगे पाटील यांना वाचवावं. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असं कळकळीचं आवाहन मराठा आंदोलकांनी केलं आहे.मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अंगात ताकद राहिली नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे. पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्ते जमले आहेत. तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ चारवेळा जरांगे पाटील यांना भेटलं. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत. जीआरमध्ये फक्त कॉमा टाकायचा आहे, असं खोतकर म्हणाले. तो कॉमा आज तिसऱ्या दिवशीही न निघाल्याने मराठा आंदोलक संतापले आहेत. अर्जुन खोतकर आणि गिरीश महाजन यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतली. पण त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here