वीस हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले .

इंदापूर: शेत जमिनीची हद्द कायम करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.14) सायंकाळच्या सुमारास रंगेहात पकडले. राजाराम दत्तात्रय शिंदे (वय 54 वर्षे ) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. इंदापूर तालुक्‍यातील निंबोडी येथील एका शेतकऱ्याला शेतीची मोजणी व हद्द कायम करायची होती. त्याने यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय फी भरली होती.नमूद क्षेत्राच्या मोजणीनंतर हद्द कायम करण्यासाठी शेतकऱ्याच्या पुतण्याकडे संबंधित कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. पुतण्याने याबाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मंगळवारी सायंकाळी इंदापूर प्रशासकीय भूमी अभिलेख कार्यालय येथे सापळा लावला. यामध्ये मोजणीदार राजाराम शिंदे (रा. मु.पो ढोक बाभुळ, ता. मोहोळ ) याला 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here