दौंड:(तालुका प्रतिनिधी-गणेश खारतुडे)पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे तब्बल पावणे दोन लाखांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना यवत पोलीसांनी छापा टाकून अटक केली आहे. अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.संदीप मधुकर चव्हाते ( वय २७ ) व अक्षय सतीश जाधव ( वय २४, दोघेही रा. कोथरूड पुणे ) असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे सोलापुर महामार्गालगत कासुर्डी हद्दीतील गांजाची तस्करी होत असल्याची माहिती यवत पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत सोमवारी ( दि.३ ) हॉटेल नुरच्या पाठीमागे रोडच्या कडेला मोटार सायकल ( नंबर एम.एच १२ क्यु.के. ७२२८ ) वरून १ लाख ८४ हजार २१२ रूपये किमतीचा १०.२३४ किलो वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना सापळा रचून या दोघांना पकडले.पोलीसांनी तत्काळ मुद्देमालासह या दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस शिपाई सागर क्षिरसागर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.