क्रिकेट स्पर्धेत खेळताना चेंडू लागून तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर,तालुक्यात प्रचंड हळहळ.

पंढरपूर : क्रिकेट खेळताना चेंडूचा जोरदार मार गुप्तांगावर लागल्याने एका तरुण खेळाडूचा मृत्यू ओढवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्‍यात घडली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट हा खेळ बहुतेक सर्वांच्याच आवडीचा असून गल्ली बोळात देखील आवडीने हा खेळ खेळला जातो. अत्यंत लोकप्रिय झालेला हा खेळ खेळताना अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवलेले आहेत. गल्लीतल्या क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय खेळाडूपर्यंत अनेकांना मोठा फटका बसला आहे. कधी धावताना मृत्यू आला आहे तर कधी वेगवान चेंडू डोक्याला लागल्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाला आहे. कित्येकदा तर चेंडूमागे धावताना धाप लागून मैदानातच खेळाडूचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. असाच दुर्दैवी प्रकार पंढरपूर तालुक्यात देखील घडला असून ३५ वर्षे वयाच्या विक्रम गणेश क्षीरसागर या तरुणाचा क्रिकेट खेळामुळे मृत्यू ओढवला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या मैदानाची गरज असते आणि ग्रामीण भागात अशी मैदाने उपलब्ध नसतात. त्यामुळे शक्य तेथे काही तरुण एकत्र येवून क्रिकेट खेळाचा आनंद घेत असतात. पंढरपूर तालुक्‍यातील तावशी येथे काही मित्र मिळून माण नदीच्या पात्रात क्रिकेट खेळत होते. स्पर्धा असल्याने चुरशीने हा क्रिकेट सामना खेळ जात होता. नेपतगाव संघाकडून विक्रम क्षीरसागर हा तरुण खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला होता. विक्रम हा फलंदाजी करीत असतना गोलंदाजाने टाकलेल्या एका चेंडूचा त्याला अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो चेंडू हुकला आणि थेट जाऊन गुप्तांगावर आदळला.जोराचा मार बसल्याने विक्रम जागीच खाली कोसळला. गुप्तांगावर चेंडूचा जोरदार आघात झाल्याने प्रचंड वेदना होत होत्या.खेळता खेळता चेंडू लागल्याने विक्रम खाली कोसळताच इतर खेळाडू त्याच्याकडे धावत गेले. विक्रमच्या अन्य मित्रांनी त्याच्याकडे धाव घेत त्याला उचलले आणि पंढरपुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. खेळाचा आनंद घेता घेता आयुष्याचाच शेवट होण्याची, मनाला चटका लावणारी घटना घडून गेली. या दुर्दैवी घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी संपूर्ण दक्षता घेवूनच क्रिकेट खेळण्याची आवश्यकता असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here