इंदापूर तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देऊ – हर्षवर्धन पाटील. हजारोंच्या उपस्थितत आप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार ..

इंदापूर: इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडणुकीतून स्पष्ट झाली आहे. विधानसभा निवडणूक आपल्या हातून अल्पशा मताने गेली. मात्र आता आगामी काळात तालुक्यात होणाऱ्या सर्वच निवडणुका जिंकून इंदापूर तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी स्पष्ट ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर येथे शिवण्या लॉन्स येथे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झालेबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचा भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते गुरुवारी (दि.23) सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, कार्यकर्ते यांनी संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार केला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, आपण विरोधी पक्षात असूनही बँकेची निवडणूक बिनविरोध झाली हे महत्वाचे आहे. जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीसाठी वरिष्ठांची आपण चर्चा केली, जरी निवडणूक लागली असती तरी आपला एकतर्फी विजय निश्चित होता. आप्पासाहेब जगदाळे यांनी गेली 19 वर्षे बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. राजेंद्रकुमार घोलप, शिवाजीराव निंबाळकर, अविनाश घोलप यांनीही यापूर्वी बँकेवर संचालक म्हणून काम केले.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे धोरण आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेस ही केंद्राकडून धोरणात्मक निर्णयांसंदर्भात सहकार्य करता येईल. आता तालुक्यातील होणाऱ्या 54 विकास सोसायट्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. या निवडणुकांसाठी आम्ही, आप्पासाहेब, जाचकबापू कार्यकर्त्यांना मदत करणार आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, आता अधिक जोमाने आपणा सर्वांना कामाला लागावे लागणार आहे. झालेल्या चुका विसरून जाऊन आगामी सर्व निवडणुकांत आपण 100 टक्के विजय मिळवू. बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल अप्पासाहेब जगदाळे यांनी आभार व्यक्त केले. तसेच बँक निवडणुकीत उर्वरित जागांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, दादासाहेब फराटे हे उमेदवार रिंगणात असल्यामुळे आपणास त्यांना मतदान करावे लागणार आहे, असेही अप्पासाहेब जगदाळे यांनी भाषणात नमूद केले.
प्रास्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी केले. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, अँड. कृष्णाजी यादव, विलासबापू वाघमोडे, तानाजी थोरात, बाळासाहेब डोंबाळे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.
———————————————-
आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, इंदापूर अर्बन बँक आदि सर्व निवडणुका आपण जिंकू. इंदापूर शहरात नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी चांगले काम केले आहे. विधानसभा निवडणूक ताकदीने लढवून तालुक्याची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
__________________________________
 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here