👉 अपुरे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान,गटविकास अधिकारी यांच्या कडून वर्ग खोल्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन.
निमगाव केतकी: आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाला शिक्षणाच्या बाबतीत कोणतेही तडजोड होणार नाही अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळा सोडून पालक आपल्या पाल्यांना खाजगी शाळेत ऍडमिशन घेण्यास भर देतात. परंतु जिल्हा परिषदेची निमगाव केतकी येथील भोसले वस्ती शाळा याला अपवाद आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून येथील शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे येथील शाळेसमोर ऍडमिशन फूल चे बोर्ड लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.सध्या या शाळेत १७७ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना बसण्यासाठी पुरेशा वर्गखोल्या व शिक्षक अपुरे पडत असल्याने तसेच आहे त्या खोल्याही नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी आत येत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आज पर्यंत या गोष्टीकडे कोणीही गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळेच दि.१३ जून रोजी झालेल्या पालक मिटिंग मध्ये पालक आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना शाळेत येण्याची वेळ आली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी लवकरात लवकर वर्गखोल्यांची सोय केली जाईल असे आश्वासन दिले तसेच शिक्षका संदर्भात बोलताना सांगितले की शिक्षक बदली ची पद्धत ही ऑनलाईन असून बदल्या चालू होताच या शाळेस शिक्षक दिला जाईल.यावेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षण अधिकारी खरात, केंद्रप्रमुख संभाजी आजबे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 चौकट: इंदापूर तालुक्याचे आमदार तसेच राज्याचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी या शाळेची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल लवकरात लवकर वर्गखोल्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी पालकांनी मागणी केली.