राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे.बगेश्वरी धामममधून पहाटे 4 वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता, काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या अटकेसाठी पाठवले होते.
रायपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी दूर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटकेची कारवाई केली. संध्याकाळपर्यंत पोलीस कालीचरण महाराजला घेऊन रायपूरमध्ये पोहोचतील”.
रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. IPC च्या कलम ५०५(२) [वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छा निर्माण करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे] आणि कलम २९४ [कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य] अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रायपूरमध्ये एफआयआर दाखल होताच कालीचरण महाराज छत्तीसगडमधून पळून गेल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पथके पाठवली होती. त्यानंतर कालीचरण महाराजला रायपूरमधून अटक करण्यात आली.छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रायपूर धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिले होतं.
महाराष्ट्रातही गुन्हे दाखल –
महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजविरोधात ठाणे शहरात पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींसंबंधी वापरण्यात आलेल्या शब्दामुळे मला दुःख झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले. नौपाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, धार्मिक भावना भडकावण्याच्या उद्देशाने तसेच इतर गुन्ह्यांसाठी आयपीसी कलम २९४, २९५ए, २९८, ५०५(२) आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कालीचरण महाराज मूळचा अकलो्याचा असून तिथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home गुन्हेगारी अखेर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना ठोकल्या बेड्या. छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्रात ही...