“प्रत्येक वेळेस कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा बळी गेल्यावरच प्रशासन दखल घेणार आहे का?” जिल्हाधिकारी यांना कुणबी सेना युवा दलाकडून लक्षवेधी निवेदन.

वैभव पाटील :प्रतिनिधी ( 📞9850868663 )
पालघर: दि. 8 सप्टेंबर रोजी कुणबी सेना युवा दलाकडून मृत्यूचा सापळा बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील सुरक्षा व बेकायदेशीर रस्ते कर (टोल) आकारणी बंद करण्या संदर्भात जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन दिले. मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर अनेक ठिकाणी पडलेले मोठ मोठे खड्डे तसेच अपघाती क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट) सूचना फलक न लावल्यामुळे शेकडो निरपराध लोकांचे निरंतर बळी जात आहेत; तसेच विविध वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या महामार्गावरून दररोज प्रवास करणारे हजारो नोकरदार, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी युवा-युवती यांचे जीवन कंत्राटदारांच्या सदोष कामामुळे व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धोक्यात येऊन अपरीमित प्राणहानी होत आहे. रस्ते कर आकारणीची (टोल नाका) वाढीव मुदत संपूनही बेकायदेशीरपणे 100 टक्के टोल वसुली सुरू असून काही दिवसांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींनी आंदोलन करुनही रस्ते दुरुस्तीच्या नावाने तोंडाला पाने पुसायचे काम मात्र प्रशासनाकडून सुरु आहे.
आज महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून वरई नाका येथील पुलावरील खड्डा चुकवत असताना 30 ऑगस्ट रोजी कुमारी प्रिया रविंद्र पवार, वय 25 वर्ष (मु.हालोली ता. पालघर) या तरुण भगिनीचा नाहक बळी जाऊन आजपर्यंत शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा बळी गेल्यावरच प्रशासन दखल घेणार आहे का? यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून पुढील 8 दिवसांमध्ये वरील विषयांचे समाधानकारक निरसन व्हावे तसेच त्याबाबत आम्हाला लेखी कळवावे. अन्यथा 8 दिवसा नंतर कुठलीही पूर्व सूचना न देता कुणबी सेनेच्या माध्यमातून कुणबी सेनाप्रमुख सन्मा. विश्वनाथ पाटीलसाहेब आणि पालघर जिल्हाप्रमुख सन्मा. अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 रोखून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच सदर आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचे कायदा, प्रशासन व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यास शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
आपण वरील विषयांची योग्य ती दखल घेऊन नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.अशी माहिती पालघर कुणबी सेना युवा दल प्रमुख प्रशांत सातवी यांनी दिली. सदर प्रसंगी युवा दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कुणबी सेना युवा दलाचे प्रितम पाटील, अमेय पाटील, राजु पाटील,दिपेश पाटील, योगेश पाटील, जयेश पाटील, धिरज पाटील, विपुल सातवी, भावेश घरत, प्रकाश शेलार, गणेश नाईक, गौरांग पाटील, गौरव कंडी, पंढरी पाटील, मंथन पाटील,हार्दिक पाटील उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here