प्रसिद्ध सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्स जगभरात लोकप्रिय आहे. अनेक देशात बेअर ग्रिल्सचे लाखो चाहते आहेत. त्यांचे सर्व्हायव्हल शो पाहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. Man Vs Wild शो सुरू केल्यानंतर, आता Into the Wild with Bear Grylls हा शोदेखील खूप प्रसिद्ध झाला आहे. या शोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
प्राण्यांना मारुन खाणार नाही
हा शो एक सर्व्हायव्हल शो असून, निर्जन आणि घनदाट जंगलात एकटे कसे जगायचे हे यात शिकवले जाते. खाण्यापिण्याची सोय नसताना बेअर ग्रिल्स अनेक वेळा शोमध्ये जंगली फळे आणि साप-विंचवासह अनेक प्राणी खाताना दिसले आहे. पण, आता बेअरला आपल्या कामाचा पश्चाताप होत आहे. एका मीडिया हाउसला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये बेअरने यापुढे कुठल्याही प्राण्याला मारणार नसल्याचे म्हटले आहे.
शाकाहारी लोकांकडून प्रेरणा मिळाली
याबाबत बेअर म्हणाला, ‘माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी जगण्याच्या नावाखाली खूप प्राण्यांना मारले. पण, आता मी त्यापासून खूप दूर आलो आहे. माझ्या शोमध्ये अनेक शाकाहारी लोक येऊन गेले, त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. यामुळेच आता मी प्राण्यांना न मारण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मी फक्त आधीच मेलेले प्राणी खाणार,’अशी माहिती बेअर ग्रिल्सने दिली.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शोमध्ये
विकी कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासह अनेक भारतीय स्टार्सनी बेअर ग्रिल्सच्या शो ‘इनटू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बेअर ग्रिल्ससोबत शोमध्ये दिसले आहेत.