निमगाव केतकी: श्री केतकेश्वर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मनमिळाऊ चित्रकला शिक्षक श्रीधर मारुती राऊळ यांचे आज दि.१७ डिसेंबर रोजी अचानक दुःखद निधन झाले आहे. प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे सदरचे शिक्षक शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना सकाळी 8 वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृतीची हालत पाहता स्थानिक डॉक्टरांनी इंदापूरला उपचारासाठी दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शाळेतील त्यांच्याच सहकार्यांनी त्यांना त्वरित इंदापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकीतील अतिशय मनमिळावू व सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे वाटणारे राऊळ सर हे मूळ राहणार देहुगावचे असून साधारण चौदा वर्ष ते याच शाळेत शिकवत असल्यामुळे सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते त्यामुळे ते अचानक गेल्याने अनेक विद्यार्थीसह पालकांनाही दुःखद धक्का बसला आहे.चित्रकला विषय शिकवणाऱ्या या सरांचे सर्व विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. हसत खेळत चित्रकला शिकवणे व वेगवेगळ्या कविता करणे हा त्यांचा छंद होता.“राऊळ सर अचानक जाण्याने खूप दुःख व्यक्त होत आहे व या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत” अशा भावना शाळा समितीचे अध्यक्ष पत्रकार नीलकंठ भोंग यांनी व्यक्त केल्या.
“लढाई” हे व्हाट्सअपचे शेवटचे स्टेटस:- चित्रकला शिकवणाऱ्या राऊळ सर यांना कविता लिहिण्याचीही खूप आवड होती त्यांनी एक जुनी लिहिलेली “लढाई” ही कविता कालच व्हाट्सअपच्या स्टेटसला ठेवली होती आणि हाच त्यांचा शेवटचा व्हाट्सअप स्टेटस होता.