गरजू माणसाला आणीबाणीच्या काळामध्ये कोण कधी कशा पद्धतीने मदत करेल हे सांगता येत नाही. काही लोक इतकी वेळेवर मदतीला येतात की त्यांना “देवासारखा धावून आला ओ…” अशी उपमा दिली जाते.अगदी अशाच प्रमाणे पुणे-सोलापूर रोड वरील टोलचे कर्मचारी उत्तर प्रदेश मधील एका महिलेस मदत करतात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रसूतीसाठी जात असलेल्या महिलेची प्रसूती सोलापूर- पुणे महामार्गावरच्या सावळेश्वर टोल नाक्यावरच झाली.टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि मदतीमुळे रस्त्यावर रुग्णवाहिकेतच महिलेने जुळ्यांना जन्म दिला.
उत्तर प्रदेशातील महिला टेंभुर्णीमध्ये पेपर मिलमध्ये काम करते. ती दोन महिला सहकाऱ्यांसह डिलिव्हरीसाठी रिक्षातून टेंभुर्णीहून सोलापूरकडे येत होती. सावळेश्वर टोल नाक्यावर त्यांची रिक्षा बंद पडली. त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच रूट ऑपरेशन टीममधील मंजुनाथ पुजारी, पवन प्रशांत सिंह,अभिषेक पांडे,रोहित पांडे,प्रकल्प व्यवस्थापक दिनेश साही यांनी सर्व यंत्रणेला सजग केले. पॅरामेडिकल कर्मचारी सुदर्शन एरनाळे यांनी रुग्णवाहिकेतच प्रसूतीची व्यवस्था उभी केली.रुग्णवाहिकेत त्या महिलेने एका मुलास जन्म दिला. मात्र अजून एक गर्भ असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्वरित रुग्णवाहिकेतून तिला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. हॉस्पिटलमध्ये त्या महिलेने एका मुलीस जन्म दिला. काल बालदिन सर्वत्र साजरा होत असताना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एका महिलेला तत्परतेने मदत केल्यामुळे बालदिनी त्या गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात आले.
Home Uncategorized पुणे- सोलापूर टोल नाक्यावरच महिलेची प्रसूती, जुळ्यांना दिला जन्म. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे...