😢 शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर, तब्बल 22 गाईंचा मृत्यू होऊन अख्खा गोठा झाला रिकामा.. वाचा सविस्तर एका शेतकऱ्याची हृदयद्रावक कहाणी….

शेतकऱ्यावर नेहमीच वेगवेगळी संकटे येत असतात त्यातूनही हा जगाचा पोशिंदा वेगवेगळ्या संकटावर मात करून आपल्याला संसार चालवीत असतो. अनेक नैसर्गिक व कृत्रिम संकट झेलत शेती पूरक व्यवसायही करतो आणि अशा शेतकऱ्याचा प्रमुख शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायकडे पाहिले जाते. ढेरे बंधूंनी सुद्धा असाच चांगल्या पद्धतीचा दुग्ध व्यवसाय चालू केला होता परंतु त्याला अचानक नजर लागली आणि आठ दिवस झाले, गोठा रिकामा होतोय, दररोज दोन-तीन गाई दम तोडत आहेत. एक-एक करत बावीस गाईंना गोठ्यातून बाहेर काढावे लागले.लेकरांसारखी जपलेली जित्राबं डोळ्यांदेखत जात असल्याने आभाळ कोसळलंय, एवढं दुःख ओढावलंय की ते पचवायचं कसं, नेवासा तालुक्यातील लोहगावच्या ढेरे कुटुंबाची ही अवस्था जिवाची काहिली करणारी आहे.
गाईंना वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पराकाष्ठा असूनही मृत्युसत्र थांबेना. आठ दिवसांत तब्बल बावीस गाईंचा मृत्यू होणं थरकाप उडवणारं आहे. या प्रकाराने लोहगावात सन्नाटा पसरलाय. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगावापासून पाच किलोमीटर अंतरावर लोहगाव. या भागात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करतात. आठ दिवसांपासून मात्र हे गाव चर्चेत आलेय ते ढेरे कुटुंबातील दुभत्या गाईंच्या अचानक होत असलेल्या मृत्यूमुळे. जनार्दन सोपान ढेरे यांचे सर्वसाधारण कुटुंब. रोहिदास व रामदास हे त्यांची मुले शेती करतात. २००९ पासून शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला दोन-चार गाई होत्या. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. गाईंचा विस्तार होत असल्याने चांगल्या गोठ्याचे बांधकाम केले. आता गोठ्यात २९ गाई झाल्या होत्या. दररोज दोनशे लिटरच्या जवळपास संकलन व्हायचे. गाईचा विस्तार अधिक असल्याने पाच एकरांवर चाऱ्याची लागवड. रोजच्या चाऱ्यात विकत आणलेला ऊस, गिन्नी गवत आणि लसूण घास असायचे.बुधवारी (ता. २१) नेहमीप्रमाणे ऊस, गिन्नी गवताची कुट्टी एकत्रित करून जनावरांना टाकली. लसूणघास दिला. रात्री एकच्या सुमारास गाईंचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका गाईचा मृत्यू झाला. एका दिवसात सायंकाळपर्यंत पाच गाईंचा मृत्यू झाला. चाऱ्यांतून विषबाधा झाल्याचे समजून पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू झाले, मात्र गाईंचा मृत्यू थांबला नाही. लोहगावासह परिसरातील गावांत माहिती कळाली आणि गावकरी हादरले. आठ दिवसांपासून गावांतील शेतकरी, महिला नातेवाईक ढेरे वस्तीवर बसून आहेत. आजपर्यंत २२ गाईंचा मृत्यू झालाय. अचानक आलेल्या संकटाने ढेरे कुटुंब मोडून पडलेय. लेकरासारख जपलेल्या गाई डोळ्यासमोर जीव तोडत असल्याने कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाहीत. गावातही सन्नाटा पसरल्यासारखा झालाय. आभाळच कोसळलेय, दुःख पचवायचे कसे, असा प्रश्‍न येथे येणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे, असे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब राजळे म्हणाले.
👉 सगळंं झालं पण मृत्यूचे कारण स्पष्ट होईना…
लोहगावांत ढेरे यांच्या पाच गाईंचा सुरुवातीला गुरुवारी (ता. २२) मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांच्या तपासणीत पुण्यातील रोगनिदान प्रयोगशाळेच्या अहवालात चाऱ्यात आॅक्सिलेट, नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने गाईंच्या मृत्यूनंतर पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. सुनील तुंबारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. घोडेगावचे पशुधनविकास अधिकारी डाॅ. मनोज अभाळे, सहायक पशुधनविकास अधिकारी नेवाशाचे डाॅ. नितीन पालवे, तालुका विस्तार अधिकारी डाॅ. दिनेश पंडुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उर्वरित गाईंवर उपचार सुरू केले. मात्र गाईंचा मृत्यू होण्याचे सत्र अगदी आजपर्यंत थांबायला तयार नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागानेही आता हात टेकलेत. आतापर्यंत ढेरे कुटुंबाने औषधोपचारावर सुमारे चार लाखांच्या जवळपास खर्च केला आहे. आता मात्र ढेरे कुटुंबासह गावकऱ्यांना गाईंच्या मृत्यूबाबत वेगळीच शंका येऊ लागली आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. मात्र उपचारानंतरही गाईंच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने गावकरी, या भागातील दूध उत्पादक मात्र हादरले आहेत. मृत्यूचे कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे कुशीनाथ ढेरे यांनी सांगितले.
👉 दुःखात असलेल्या याच शेतकरी कुटुंबाला मदतीची गरज..
ढेरे कुटुंबाचे या अपघाताने वीस लाखांच्या जवळपास नुकसान झालेय. कालच (मंगळवारी, ता. २७) शेतकरी मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे यांच्यासह गावकऱ्यांनी मुंबईत पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मदत देण्याची विनंती केलीय. आतापर्यंत नेत्यांनी लोहगावाला भेटी दिल्या. तहसीलदार व पशुसंवर्धनचे अधिकारी वगळता अन्य अधिकारी अजून येथे आले नाहीत. अजून कोणतीही मदत मिळाली नाही. नागरिक मदतीसाठी पुढे येतील, मात्र प्रशासकीय पातळीवर भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
आमच्या आयुष्यात असा प्रकार कधी पाहिला नाही. अत्यंत संघर्षातून आपला दूध व्यवसाय वाढवलेल्या ढेरे कुटुंबाचे आठ दिवसांत होत्याचे नव्हते झाले. कुटुंब पुरते मोडून पडलेय. या कुटुंबाला आता आधाराची गरज आहे. शासनाने या कुटुंबाला भरीव हात देण्याची गरज आहे असे मत भाऊसाहेब राजळे पाटील माजी सरपंच यांनी व्यक्त केले.
एकंदरीतच शेतकऱ्याच्या पुढे काही ना काही अडचणी निर्माण होत असतात पण ही अडचण कुणी कधी याचा विचारही केला नसेल अशी अडचण आहे असं म्हणता येईल. आता या अडचण आणि दुःखातून ढेरे कुटुंब सावरायला वेळ लागेल हे मात्र नक्की..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here