नीरा-भीमा कारखान्याचा दिवाळी पूर्वी रु.311 चा हप्ता – हर्षवर्धन पाटील
– वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
– सीरप पासून घेणार इथेनॉल उत्पादन
इंदापूर: प्रतिनिधी दि.27/9/22
निरा भिमा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रति टनास रु. 311 प्रमाणे ऊस बिलाची देय एफआरपीची रक्कम अदा केली जाईल. गत गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसास कारखाना जाहीर केले प्रमाणे प्रति टनास रु.2501 प्रमाणे दर देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.27) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2021-22 ची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
निरा भिमा कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रु. 2100 प्रमाणे हप्ता अदा केला असून, दिवाळीपूर्वी रु. 311 प्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, चालू होणाऱ्या सन 2022-23 च्या गळीत हंगामामध्ये कारखाना प्रथमच थेट उसाच्या सिरप पासून इथेनॉल निर्मिती करणार आहे. तसेच आगामी काळात इथेनॉल प्रकल्पाची उत्पादन क्षमता 2 लाख लि. प्रतिदिनी करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. तसेच राज्यातील इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारही सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
आगामी सन 2022-23 च्या गळीत हंगामात कारखाना 8 लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण करणार आहे. तर इथेनॉलचे 1 कोटी 65 लाख लिटर निर्मितीचे व 4 कोटी 50 लाख युनिट वीज एक्सपोर्टचे उद्दिष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले. नीरा भीमा कारखान्याकडे आज अखेर 8 लाख मे. टन नोंदीचा ऊस असून, बिगर नोंदीचा 1 लाख व गेटकेन 1 लाख प्रमाणे कारखान्याकडे सुमारे 9.5 ते 10 लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
नीरा भिमा कारखान्याने स्थापनेपासूनच्या 21 गळीत हंगामामध्ये ऊस बिलापोटी रु. 3000 हजार कोटी रुपयाहुन अधिकची रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. कमी दिवसांमध्ये अधिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, निरा भीमा कारखाना लवकरच राज्यातील पहिल्या 10 कारखान्यांमध्ये निश्चितपणे येईल, असा ठाम विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
निरा भीमा कारखाना या परिसरासाठी संजीवनी असून, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या 10 हजारहुन अधिक कुटुंबांचे संसार या कारखान्यावरती अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी उसाचे एकरी टनेज वाढीकडे लक्ष द्यावे. सहकार म्हणजे विश्वास, स्वायत्तता, प्रगती हा शब्द निरा भीमा ने सार्थ ठरविला आहे, असे गौरोदगार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, देवराज जाधव, अनिल पाटील, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, महादेव घाडगे, किरण पाटील, विश्वासराव काळकुटे, सुरेश मेहेर, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, मोहन गुळवे, कमाल जमादार व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. सभेत अहवाल वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.