राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत निमगाव केतकी उपसरपंच पदी मिना भोंग यांची फेरनिवड..- “आर्थिक शक्तीच्या ताकदीवर एकाधिकार मिळवणाऱ्यांविरोधात गावकऱ्यांनी केलेला बंड कौतुकास्पद”- ॲड राहुल मखरे

👉 पक्षातीलच काही नाराज तसेच विरोधकांचा पाठिंबा घेत केले यश संपादन.
उपसंपादक निलकंठ भोंग
निमगाव केतकी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत मिना दिपक भोंग यांनी निवडणुकीत विजय संपादन केला. पक्षातील काही नाराज सदस्य आणि विरोधकांच्या पाठिंबामुळे त्यांनी उपसरपंच पदावर फेर निवड करण्यात आली. १७ पैकी ०९ मते मिळवत त्यांनी अलका माणिक भोंग यांचा एका मताने पराभव केला.उपसरपंच पद हे नऊ नऊ महिने असे विभागून देण्याचे ठरले होते. परंतु कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मिना भोंग यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
या अटीतटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच मिना भोंग यांना बंडखोरी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्या पदाच्या कार्यकाळात आपल्या वार्डात अनेक कामे झाली नाहीत. त्याचबरोबर त्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप केला. गावाच्या विकासाबाबत एकाही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अशा या मनमानी कारभाराला कंटाळूनच कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांचे पती बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक (बाबासाहेब)भोंग यांनी सांगितले की, गावात होणाऱ्या विकास कामाच्या निर्णयात सरपंचाकडून नेहमी उपासना करण्यात आली. कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. गावातील अनेक कामे ही जवळच्या लोकांना दिली गेली त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो, तसेच या गावातून भरणे मामांना मिळणाऱ्या लीडवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भरणे मामांनी या ग्रामपंचायतकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.
देवराज भाऊ जाधव तुषार जाधव तसेच तात्यासाहेब वडापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपसरपंचाच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यात आला होता. नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने मिना भोंग यांचा सत्कार करण्यात आला.गावातील या राजकीय घडामोडी बद्दल बहुजनमुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निमगाव केतकी हे इंदापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव आहे.गावातील काही लोकांनी आर्थिक शक्तीच्या ताकदीवर स्थानिक पातळीवर एकाधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न निमगावकरांनी बंड करून मोडून काढला याचे कौतुक वाटते, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे आणि अशाच प्रकारे भविष्यात सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये भाजप विरोधात हीच परिस्थिती निर्माण होईल असे महत्त्वपूर्ण भाकीत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.के.चांदगुडे यांनी काम पाहिले यावेळी सरपंच प्रवीण डोंगरे, ग्रामसेवक दत्तात्रय केकान, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, दादाराम शेंडे, सचिन चांदणे, अजित मिसाळ, सचिन जाधव, अमोल हेगडे, मधुकर भोसले, रीना भोंग, अर्चना भोंग, लता राऊत,कलावती राऊत, सारिका मिसाळ, अनुराधा जगताप, मनीषा बारवकर, पांडुरंग हेगडे, शंकर मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मिसाळ, अनिल भोंग, हनुमंत राऊत, अमोल राऊत, भारत मिसाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here