मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उध्दव ठाकरे यांच्या विरोधातील बंडानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी पहावयास मिळत आहेत.महाराष्ट्रातील तब्बल 50 आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यास शिंदे गटाची टीम यशस्वी झाली
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर तयार झालेल्या राजकीय पेच थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे. काल देखील सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली होती.आज पुन्हा एकदा न्यायालयाने दोन्हीही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि काही महत्वाचे निर्देश दिले.
शिवसेना नेमकी कोणाची ? आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? याकडे देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.तसेच याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी पार पडेल असे देखील यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या सुनावणीचा हा दुसरा दिवस होता. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्या संघर्षाबाबत आजही न्यायालयाने कोणताही निवाडा केला नाही. न्यायालयात आजही दोन्हीही वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आता ८ ऑगस्टच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.