पुण्यातील हडपसर येथील स्वानंद क्लिनिक चे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन….
हडपसर प्रतिनीधी: रविंद्र शिंदे
गोरगरीबांना माफक दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी स्वतःचे घर मोडून त्या ठिकाणी स्वानंद क्लिनिक हे उत्तम दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यांचा हा उपक्रम खरोखर स्तुत्य व दीपस्तंभा प्रमाणे समाजातील इतर घटकांना मार्गदर्शक ठरणारा आहे, असे गौरवोद्गार हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी काढले.हडपसर येथे साडे सतरा नळी येथे स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या पुढाकारातून गोरगरिबांसाठी अल्प दरात उपचार व्हावे म्हणून स्वानंद क्लिनिक ची उभारणी करण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार तुपे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपसभापती संदीप तुपे तसेच साडेसतरा नळी येथील माजी उपसरपंच रुपेश तुपे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी आमदार चेतन तुपे यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले की, ह भ प मच्छिंद्र महाराज यांचे कार्य कौतुकास्पद आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून दवाखाना उभारून समाजाची सेवा करणे हे त्यांनी घालून दिलेले उत्तम उदाहरण आहे. ज्ञानेश्वरी तसेच हरिपाठातील अनेकजण दाखले देतील, पण जिवंत उदाहरण पहायचं झालं तर मच्छिंद्र महाराजांच्या रूपाने ते काम पुढे आहे. असे सांगत उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.आता समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन आमदार तुपे यांनी केले.आमदार तुपे पुढे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात आम्ही काम करत असताना असा अनुभव येतो की, एडमिट करताच 50 हजार रुपये भरा, दोन लाख, चार लाख बिल झालेय काहीतरी कमी करा म्हणून आम्हाला विनंती केली जाते मात्र हॉस्पिटल रक्कम काही कमी करत नाही. माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत, तसे जन्म मृत्यू आणि आजार हे देवाने केलेल्या कायमच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जीव जन्माला आला की त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्म मृत्यूच्या प्रवासा दरम्यान तो आजारी पडणारच आहे. देवाने देहरूपी दान दिले असताना आपण स्वत:ची काळजी घेत नाही. व्यायामाचा अभाव, बैठे काम जास्त, जिभेचे चोचले पुरवणे असे दिसून येते. संध्याकाळी कमी जेवा असे आयुर्वेदात सांगितले तरीही मांसाहार जास्त केला जातो, अशावेळी काही अडचण शारीरिक व्याधी झाल्यावर डॉक्टर हा लागतो. सध्या वैद्यकीय उपचार खूप महाग झालेत अशा कठीण परिस्थितीत ह भ प लांडगे महाराजांनी पुढाकार घेवून गोरगरिबांसाठी मदत करण्याच्या भावनेनी तीन मजली हॉस्पिटलची उभारणी केली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून वीस रुपयांमध्ये ओपीडी होत आहे, असे सांगत गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन वैद्यकीय शिबिरे घेऊन मोफत औषध पुरवण्याचे नियोजन या स्वानंद प्रतिष्ठानचे आहे. त्यांचे कार्य खूप चांगले आहे असे सांगून केलेल्या कार्याचे आमदार तुपे यांनी कौतुक करत आरोग्य सेवेच्या कार्यात आपण लांडगे महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे स्पष्ट केले.स्वानंद चे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी गाव तिथे दवाखाना भविष्यकाळात उभारण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करत गोरगरिबांची सेवा हे उद्दिष्ट राहील असे सांगितले.कार्यक्रमास डॉ.सुजीत गायकवाड,डाॅ.हेमा शिंदे,डाॅ.संतोष खरात,डाॅ.सुभाष रोमन, स्वानंद प्रातिष्ठानचे कोअर कमिटि सदस्य,सभासद,कार्यकर्ते,साधक तसेच स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
Home Uncategorized सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्यसेवा मिळण्यासाठी हभप मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी स्वत:चे घर...