सचिन गायकवाडच्या अटकेनंतर नगर अर्बन बँकेचे 150 कोटीचे अफरातफरीचे रहस्य उलगडून पडद्यामागील हिरोंवर कारवाई होण्याची शक्यता.

नगर अर्बन बँकेच्या दीडशे कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला आरोपी सचिन गायकवाड (रा. देऊळगाव ता. श्रीगोंदा) याने कर्ज प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे.अर्बन बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड या प्रकरणी तपास करीत आहेत.
या गुन्ह्यातील आरोपी गायकवाड याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने गायकवाडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगाव येथून ताब्यात घेत अटक केली.
तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी गायकवाड याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. त्याने घृष्णेश्‍वर मिल्क व जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन या कंपन्यांसाठी नगर अर्बन बँकेकडून कर्ज घेतले होते. यासाठी बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते.यासाठी व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला होता. तसेच घेतलेले कर्ज ज्याउद्देशासाठी घेतले, त्यासाठी वापरले नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आताच्या स्थितीत त्याला बँकेला 32 कोटींपेक्षा जास्त रक्कम देणे असून,तिच्या परतफेडीस त्याने असमर्थता दर्शवल्याने त्याने बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्याकडील तपासात त्याने बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा विनियोग कसा केला, याची सविस्तर माहिती घेण्यावर भर दिला आहे.
दरम्यान अर्बन बँकेकडून कर्ज घेताना त्याने तारण मालमत्तेचे बनावट व्हॅल्युएशन करून त्याचा रिपोर्ट सादर केला असल्याने या कामात त्याला कोणी मदत केली,का त्याने कोण कोणत्या खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले. व्हॅल्युअरचे बनावट सही-शिक्के कसे मिळवले, बनावट मूल्यांकन रिपोर्ट कोणी तयार केला,
बँकेचे अधिकारी व संचालकांपैकी कोणी त्याला या कामात मदत केली काय, कर्ज घेतलेल्या पैशांचे काय केले, अशा अनेक विविध मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरू केल्याने यातील त्याचे साथीदारही शोधले जाणार आहेत.
चौकट
सचिन गायकवाड सारखे अनेक बोगस कर्जदार आहेत त्यांचे परतफेडीचे क्षमते पेक्षा जास्तीचे कर्जे संचालक मंडळाने मंजूर केली आहेत. माझे फिर्यादीत मी त्याचा तपशील दिलेला आहे हे सर्व कर्जदार व संचालक मंडळाला ताब्यात घेवुन जलद तपास झाला तर नगर अर्बन बँकेचे अफरातफरी चे सर्वच प्रकरण तातडीने सुटेल व पाच लाखापूढील ठेवीदारांना लवकर ठेवी परत मिळणेस मदत होईल असे राजेंद्र गांधी यांनी सांगितले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here