इंदापूर: 6 जून हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. इंदापूर महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज 348 वा शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंदापूर महाविद्यालय ते नगरपरिषद अशी शिवज्योत रॅली देखील यावेळी काढण्यात आली. शाहीर अमर शेख सभागृहामध्ये शिवकालीन क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिकेचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.इंदापूर नगरपरिषदे समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले की,’ परकीय सत्तेने वैभवशाली भारताच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 14 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा संकल्प करून स्वराज्य स्थापन केले.छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून आदर्श न्यायव्यवस्था निर्माण केली.’कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. भिमाजी भोर ,डॉ.तानाजी कसबे, अभिमन्यू भंडलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी वीर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे आणि प्रा. बापू घोगरे यांनी केले.आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.