व्वा..! सफाळे पोलिसांनी 24 तासांच्या आत लावला मुलींचा छडा.

वैभव पाटील: पालघर जिल्हा प्रतिनिधी
आई व आजीसोबत भांडण झाले म्हणून दोन मैत्रिणी घरातून पळून गेल्याचा प्रकार मंगळवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सफाळे पूर्वेकडील कुर्लाई देवी मंदिराजवळ घडला होता. या प्रकारानंतर सफाळे पोलिसांनी दोन्ही मुलींच्या छायाचित्रासह एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याच्या मदतीने 24 तासांच्या आत दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
प्रियंका राकेश सोळंकी (वय, 15 वर्षे) रा- कुर्लाई देवी मंदिर सफाळे पूर्व या मुलीचे 19 एप्रिल रोजी तिच्या आईशी भयंकर भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून प्रियंका घराबाहेर पडली असता तिची मैत्रीण मानसी विजय तरे (वय, 12 वर्षे) रा- कुर्लाई देवी मंदिर सफाळे पूर्व हिच्याशी भेट झाली. संतापलेल्या प्रियंकाने मानसीला घरातील प्रकार सांगितला तसा मानसी नेही तिच्या आजीशी भांडण झाले असल्याचे सांगितले. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघीनीही फिरण्यासाठी जात असल्याचे घरी सांगून बाहेर पडल्या. मात्र, बरेच तास उलटूनही त्या घरी परतल्याच नाही. दोघींच्याही पालकांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर सफाळे पोलीस स्टेशन गाठून मुली हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी तात्काळ दोन्ही मुलींची छायाचित्रे व त्यांची कोणाला माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क करण्याबाबतचा एक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल केला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आदींच्या माध्यमातूनही त्यांचा तपास सुरू केला. दरम्यान, 20 एप्रिल रोजी रात्री बोरीवली स्थानकातील पोलिसांनी दोन्ही मुली स्थानकात सापडल्याची माहिती सफाळे पोलिसांना दिली. त्यानुसार आज पहाटे पोलिसांच्या पथकाने दोन्ही मुलींना सुखरूप आणून पालकांच्या स्वाधीन केले.
प्रियंका व मानसी यांचे त्यांच्या आई व आजीशी भांडण झाले म्हणून त्या 19 एप्रिल रोजी सायंकाळी घरातून निघून गेल्या. त्या थेट चरणीरोड स्थानक पोहोचल्या. रात्रभर स्थानकात काढून दुसऱ्या दिवशी त्या बोरीवली स्थानकात पोहोचल्या. मात्र परिसरात दोघींनाही पळवून नेल्याची अफवा सर्वत्र सफाळे भागात पसरून खळबळ माजली होती. दरम्यान, सर्वत्र सोशल मीडियावर त्यांचे छायाचित्रे व्हायरल झाले होते. त्या अनुषंगाने बोरीवली स्थानकातील काही प्रवाशांनी फोटोमुळे दोघींना ओळखून रेल्वे पोलिसांना त्यांची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनीही दोघींची कसून चौकशी करून तात्काळ सफाळे पोलिसांना माहिती दिली. तर प्रियंका ही याआधी सुद्धा अशाच प्रकारे घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुली व त्यांच्या पालकांना योग्य प्रकारे समजवून घरी पाठवले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here