भिगवण: “इंदापूर तालुक्याचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलणार आणि विकास झाला तरच 2024 ला तुमच्या समोर मते मागायला येणार” असे इंदापूर तालुक्याला वचन देणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.तालुक्याला कधी न मिळाला इतका निधी इंदापूर तालुक्याला राज्यमंत्री यांच्यामार्फत मिळत आहे आणि यातूनच इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात वाड्या-वस्त्यांवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यापासून इंदापूर तालुक्याच्या पूर्व,उत्तर,दक्षिण भागातील विविध विकास कामांचे उद्घाटने व भूमिपूजन झाल्यानंतर आता इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सुद्धा विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्याचे मोठे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेटफळगडे म्हसोबावाडी व निरगुडे परिसरात तब्बल 63 कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर केले असून त्यांचा उदघाटन व भूमिपूजन सोहळा 15 एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे.या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने शेटफळगडे ते म्हसोबाचीवाडी हा 13 कोटी 44 ला रुपयांचा रस्ता मंजूर केला असून,म्हसोबाची वाडी लाकडी काझड हा 17 कोटींचा रस्ता मंजूर केला आहे. याव्यतिरिक्त शेटफळगडे येथील कोठारी फार्म ते पोंधवडी इथपर्यंतचा 9 कोटी रुपयांचा रस्ता व मदनवाडी पिंपळे ते निरगुडे इथपर्यंतचा 10 कोटी 62 लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.निरगुडे येथे 2 कोटी 11 लाख रुपयांच्या खर्चाचा पूल बांधण्यात येणार असून,मदनवाडी ते बारामती भिगवण रस्त्यासाठी 1 कोटी रुपये राज्यमंत्री यांच्यामार्फत दिले आहेत.या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर,युवा नेते प्रवीणभैय्या माने,छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अमरसिंह घोलप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता मदनवाडी,येथे 5.30 वाजता निरगुडे येथे, 6 वाजता म्हसोबाचीवाडी येथे भूमिपूजन व उदघाटन होणार असून संध्याकाळी 6.30 वाजता शेटफळगडे येथे जाहीर सभा होणार आहे. यासभेमध्ये भिगवण,मसोबाचीवाडी,मदनवाडी, निरगुडे,शेटफळगडे आदी परिसरातील हजारो लोक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे व राज्यमंत्री दत्तामामा या जाहीर सभेत नक्की काय बोलतील?याकडे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच इंदापूर तालुक्याच्या पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर या चारही बाजूला समतोल प्रमाणात भरघोस निधी मंजुर करीत विकासकामांचा धडाका अविरत चालू असल्याचे दिसून येत आहे व ही बाब इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आनंदाची नक्कीच आहे अशी चर्चा चालू आहे.