इंदापूर नगरपरिषद इंदापूर प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction – स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत 309 लाभार्थी हे यादी क्रमांक 2 – (Detailed Project Report – सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना (AHP – Affordable Housing in Partnership – भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण 588 लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहे. ह्यात इंदापूर शहरात 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे असे सर्व लाभार्थी सामावले आहेत.अशी यावेळी भरणे यांनी माहिती दिली.
यामध्ये 588 घरांचा हा भव्य प्रकल्प नगर परिषद हद्दीत नियोजित असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपलब्ध असणार आहेत. ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांचे एकूण 48 दुकाने असून त्यामुळे शहरातील लघू व्यावसायिकांना उत्तम व नागरिकांना पूरक अशी व्यावसायिक संधी लाभणार आहे.
दोन्ही प्रकल्प हे 21 मार्च 2022 रोजी गृह निर्माण विभाग, मंत्रालय येथे राज्य स्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती (State Level Sanctioning and Monitoring Committee – SLSMC) ह्यांच्या बैठकीत मंजूर होऊन, 30 मार्च 2022 रोजी केंद्रीय गृह निर्माण मंत्रालय दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समिती (Central Sanctioning and Monitoring Committee – CSMC) च्या 60व्या बैठकीत मंजूर झाले असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सदर मंजुरी अन्वये दोन्ही प्रकल्पास प्रति लाभार्थी राज्य शासनाकडून रुपये 1 लाख तर केंद्रीय शासनाकडून रुपये 1.5 लाख असे एकूण प्रति लाभार्थी रुपये 2.5 लाख प्रमाणे एकूण रुपये 22.425 कोटी प्राप्त होईल.