इंदापूर : कुपोषणाला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा महिलांमधील कुपोषण कमी करणे आवश्यक आहे. यासाठी गर्भवती आणि बाळंतीण महिलांच्या आहाराची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज खंडोबानगर अंगणवाडी, बावडा
व वकीलवस्ती येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते गरोदर महिलांना बाळंतविडा व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत बेबी केअर किटचे वितरण केले. ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गरोदर माता व प्रसुती झालेल्या मातांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी ‘बाळंतविडा’ ही योजना घेतली आहे.या बाळंतविडा किटच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला आठ किलो वजनाचा कोरडा पोषण आहार दिला जात आहे. यामध्ये खारीक, खोबरं, डिंक, गूळ, काजू, आळीव, जवस, गावरान तूप, शेंगदाणे आणि फुटण्याच्या डाळ्या या १० वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तू एका बॅगमध्ये सीलबंद करून वाटप करण्यात येत आहेत, अशी माहिती अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी दिली