माळशिरस: डोंबाळवाडी कुरबावी ता. माळशिरस येथील मतदार व जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भ्रमनिरास झालेला आहे तर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचेकडून ग्रामस्थांचा अपेक्षाभंग झालेला आहे. रस्त्याचा प्रश्न अनेक दिवस रखडलेला आहे,रस्त्याच्या प्रश्नासाठी डोंबळवाडी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे डोंबळवाडीचे माजी सरपंच नाथासो गेनबा रुपनवर यांनी सांगितले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य उपस्थित होते.
कुरबावी ग्रामपंचायतमधून डोंबाळवाडी ग्रामपंचायत 1976 साली विभक्त झालेली आहे. ग्रामपंचायतचे तत्कालीन प्रथम सरपंच नाथासो गेनबा रुपनवर झालेले होते. गावातील रस्त्याच्या समस्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, डोंबाळवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर गावामध्ये दळणवळणाचा प्रश्न मोठा होता. डोंबाळवाडी जीनपुरी रस्ता क्रमांक 623 व डोंबळवाडी कुरबावी रस्ता क्रमांक 138 जिल्हा परिषदेमार्फत केलेला होता. सदरच्या रस्त्यावर दळणवळणाचा दुसरा मार्ग नसल्याने रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. गावांमध्ये 350 घरे आहेत. गावची लोकसंख्या 2500 आहे तर 1550 मतदार आहेत. प्रस्थापितांनी आजपर्यंत डोंबळवाडीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले होते. डोंबळवाडी वरून हनुमान वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची ही दुरावस्था झालेली आहे. सदरच्या रस्त्यावर हनुमान वाडी येथे रस्ता आडवलेला असल्याने त्याही रस्त्याने डोंबळवाडीकडून जीन पुरी व कुरबावी या गावाकडे जाण्यासाठी रस्ता एवढा चिखलाने माखलेला असतो, बैलगाडीमध्ये मोटर सायकल ठेवून चांगल्या रस्त्याला लागल्यानंतर मोटरसायकलवरून बाहेरच्या गावी जावे लागते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दूध व्यावसायिक यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते.एखादा आजारी किंवा इमर्जन्सी रुग्ण दवाखान्यात घेऊन जाताना आजारापेक्षा रस्त्याने पेशंटचे हाल जादा होत आहे. यामुळे गेल्या विधानसभेला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहून ग्रामस्थांनी 92% मतदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दिले होते. सुदैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे डोंबळवाडी ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. आपल्या गावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान दिलेले आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. अनेक वेळा भेटीगाठी घेऊन सुद्धा प्रश्न सुटलेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनतेचा व मतदारांचा भ्रमनिरास झालेला असून पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचेकडून ग्रामस्थांच्या अपेक्षाभंग झालेला आहेत. त्यामुळे डोंबाळवाडी जीनपुरी व डोंबाळवाडी कुरबावी रस्त्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ येत आहे, असे रुपनवर यांनी सांगून लवकरच कायदेशीर बाबींची पूर्तता करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे बायका-मुलांसह येऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
Home ताज्या-घडामोडी डोंबाळवाडी ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात – माजी सरपंच नाथासो रुपनवर.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून...