पुणे प्रतिनिधी: रविंद्र शिंदे
हडपसर – पुणे – सोलापूर महामार्गावर शनिवारी (ता. ८) मध्यरात्री हडपसर दबंग पोलिसांनी गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर पकडला. या कारवाईत कंटेनरसह सुमारे 71 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या मालाचा कंटेनर पकडल्याने सर्वत्र या दबंग पोलिसांचे कौतुक होत आहे.
याप्रकरणी वाहनचालक सामीउल्लाह मुर्जता हुसैन (वय ५१, रा. एस एस मार्ग मुंबई, मूळ मुर्तजा ग्राम, मुडीलाकला, पोस्ट लोहरसन, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज शेख (रा. गोकुळनगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी) हा आपल्या आयशर टेम्पोमधून गुटखा घेऊन निप्पाणी व विजापूर येथून सोलापूर रोडने फुरसुंगी येथे जात असल्याची माहिती उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून पंधरानंबर, हडपसर येथे गुटख्याने भरलेला आयशर ट्रक ताब्यात घेतला.त्यानंतर दुपारी (ता. ९) रोजी अन्नसुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी घटनास्थळी येऊन पकडलेल्या तंभाखूजन्य पदार्थाची तपासणी केली. सुमारे 350 गोणींमधून 46 लाख रूपये किंमतीचा हिरा पानमसाला गुटखा त्यामध्ये आढळून आला आहे. तसेच सुमारे 25 लाख रूपये किंमतीचा ट्रकही या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारात दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.अन्न व औषध प्रशासन अधिकारी गवते यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबत माहिती दिली.