औरंगाबाद (प्रतिनिधी: रसूल पठाण ): सायबर भामटे रोज नव्या नव्या युक्त्या करून सर्वसामान्य लोकांना फसवतात. विशेष म्हणजे जनजागृती केली जात असतानाही लोकं या भामट्यांच्या फंड्यांना बळी पडतात.
पूर्वी वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्याच्या नावाने त्यांचा ओटीपी मिळवून हे फसवणूक करत असत. मात्र आता ते थेट हॉटेलच्या थाळीपर्यंत पोहोचले आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad news) असाच प्रकार समोर आला आहे. एका भोजन थाळी वर दोन थाळी फ्री अशी जाहिरात भामट्यांनी फेसबुकला दिली आणि या जाहिरातीतील अमिषाला बळी पडून एक सर्वसामान्य व्यक्ती एक लाख रुपयाला फसला आहे.फेसबुकवरील शाही भोज थाळीच्या बाय वन गेट टू फ्री या जाहिरातीला भुलून बाळासाहेब ठोंबरे या शेतकऱ्याला बुकिंगसाठी त्यात दिलेल्या क्रमांकावर फोन करणे चांगलेच महागात पडले. थाळी बुकिंगसाठी मोबाइल क्रमांकही दिलेला होता. त्यावर ठोंबरे यांनी फोन लावला. समोरून बुकिंग केवळ ऑनलाइन होते, असे सांगण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवून ठोंबरे यांनी स्वतःसह क्रेडिट कार्डची सर्व माहिती दिली. तसेच मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांकही सांगितला. 300 रुपयांमध्ये असणारी थाळी त्यांना चक्क 99 हजार 890 रुपयांमध्ये पडली आहे.एक वेळा नाहीतर बुकिंग झाली नाही म्हणून दोन वेळा ओटीपी मागितला आणि लाखभराची फसवणूक झाली. ही जाहिरात आजही फेसबुक वर आहे. सदरील नंबर देखील भामटा उचलतो, त्याला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनं देखील फोन केला तर त्यावर त्यानं प्रतिनिधीला देखील हीच ऑफर दिली. औरंगाबादेतील भोज थाळीच्या मालकाला काही दिवसापूर्वी दोन लोक रोज येऊन भेटायचे, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी या प्रकाराबाबत सायबर क्राईमकडे तक्रारही केली. त्यानंतर काही काळात हा भामटा शांत राहिला मात्र, पुन्हा काही दिवसानंतर हा सक्रिय झाला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाचक मंडळीहो, सावधान अशी महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेस्टॉरंटमधून ऑफर आली तर त्याची खातरजमा करा.अन्यथा आपल्यालाही हे भामटे गंडा घातल्याशिवाय राहणार नाहीत.