इंदापूर:इंदापूर तालुक्यामध्ये मा.तालुका कृषी अधिकारी इंदापूर श्री.भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली “ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन” या अभियानांतर्गत सरडेवाडी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी ऊस तुटल्यानंतर उसाचे पाचट न जाळता ते शेतामध्येच कुजवून जमिनीची सुपीकता वाढवावी व खोडवा उसाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी श्री. आबासाहेब रुपनवर यांनी केले.यावेेेळी सरडेवाडीचे सरपंच श्री. सिताराम जानकर व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. रविंद्र सरडे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. ऊसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा 90 टक्के हून अधिक भाग जळून जातो. केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते.
एक हेक्टर क्षेत्रातून आठ ते दहा टन पाचट मिळते आणि त्यातून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फुरद, 75 ते 100 किलो पालाश आणि 3 ते 4 टन सेंद्रीय कर्ब जमिनीत घातले जाते.ऊस तोडणी नंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे कोंब जोमदार येतील. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच 0.1% बाविस्टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे आणि त्यानंतर 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक खत समप्रमाणात पसरून टाकावे. त्यानंतर उसास पाणी द्यावे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घ्यावे. पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.पाचटामुळे पाण्याची बचत होते, वीज बिलात बचत होते, तण नियंत्रण करता येते, जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनात वाढ होते व प्रदूषण घटते. त्यामुळे पाचट व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. असे कृषि सहाय्यक श्री.भारत बोंगाणे यांनी सांगितले.यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री.बळीराम जानकर, उपसरपंच श्री. हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोकुळ कोकरे तसेच श्री. संजय चित्राव, श्री. ज्ञानदेव सरडे, श्री. उत्तम चित्राव, श्री. आदित्य दंडेल, श्री. नामदेव तोबरे इ. शेतकऱ्यांसह कृषी सहाय्यक श्री. गणेश भोंग, श्री. प्रशांत मोरे व श्री. हनुमंत बोडके इत्यादी उपस्थित होते.