सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकार करण्यासाठी आलेल्या शिकारी टोळीला येथील वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. संशयितांकडून सहा जिवंत हातबॉम्ब, दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या.सकाळी त्याच परिसरात दोन रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आल्याने या घटनेचे गांभिर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणात पाच सशयितांचा समावेश असून त्यांनी जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना त्यापैकी दोघेजण अंधाराचा फायदा उठवत पळून गेले आहेत. तर तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगाव वनकक्ष क्रमांक 553 मध्ये शिकारी टोळी हात बॉम्ब गोळ्याच्या साह्याने रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्या परिसरात सापळा रचला. शिकार्यांचा अचूक माग काढत वनविभागाची टीम तेथे पोहचताच संशयित आढळून आले. त्यांना अधिक हालचालीस वाव न देता झडप टाकून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून शिकारीसाठी तयार केलेले सहा हातबॉम्ब व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
वन विभागाने केलेल्या कारवाईनंतर जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना पकडलेल्या पाचजणांपैकी दोघेजण अंधाराचा फायदा उठवून पसार झाले आहेत. या प्रकारानंतर उर्वरित तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केल्याचे सांगण्यात आले. पळून गेलेल्या संशयितांचा वनविभागाकडून काल रात्रीपासून कसून शोध सुरू आहे. उपवनसंरक्षक एम. एन मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झाजुरणे यांच्या मार्गदर्शनानुसार वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, विशाल डुबल, सुभाष पाटील, सुरेश सुतार, अमृत पन्हाळे, नथुराम थोरात, अनिकेत पाटील, अजय कुंभार यांनी ही कारवाई केली. सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शिकारीसाठी आलेल्या पाचजणांपैकी तिघांना वनविभागाच्या कर्मचार्यांनी ताब्यात घेतल्याच्या दुसर्या दिवशी सकाळी त्याच परिसरात दोन रानडुकरे मृतावस्थेत आढळून आली. या घटनेने शिकार करताना पकडलेल्यांच्या कृत्याचा कहरच पहायला मिळाला. रानडुक्कर खाद्य समजून हात बॉम्ब खाल्ल्याने रानडुकरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवैध शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी ढेबेवाडी वनक्षेत्रात वनविभागाने कडक पाऊले उचलली आहेत.