रवींद्र शिंदे: पुणे प्रतिनिधी.
जनता एक्सप्रेस मराठी न्यूज.
पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये बिबट्याने एका तरुणावर हल्ला केला आहे. गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे बिबट्या आला होता. मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका तरुणावर त्याने हल्ला केला आहे.या बिबट्याला शोधण्यासाठी आता वन विभागाचे अधिकारी आले असून सध्या शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
पहाटे “मॉर्निंग वॉक”साठी बाहेर पडलेल्या नागरिकावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये नागरिक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, वन विभाग व पोलिस प्रशासन घटनेच्या ठिकाणी दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरु आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता हडपसरमधील सीरम इंस्टिट्यूटच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती परिसरात घडली.
संभाजी आटोळे ( वय 45, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. गोसावी वस्ती परिसरात हेलिपैड आहे. तेथेच स्थानिक रहिवासी दररोज सकाळी मॉर्निंग वॉक” करण्यासाठी जातात. त्यानुसार आटोळे व त्यांचे मित्र मंगळवारी सकाळी 6 वाजता “मॉर्निंग वॉक” करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तेथे दाखल झाले. बिबट्या तेथील जवळच्याच पडक्या घरात किंवा झुडपात आहे असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यानुसार वन विभाग कार्यरत आहेत.