सचिन शिंदे : इंदापूर प्रतिनिधी
जनता एक्सप्रेस मराठी न्युज
शुक्रवार (२२ ऑक्टोबर) :- संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडून लोकांना फसवून लाखोंचा गंडा घातल्याच्या व सध्या खंडणी, बलात्कार अशा अनेक वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपात अटकेत असणारा करमाळा तालुक्यातील उंदरगावचा मठाधिश मनोहरमामा भोसलेचं प्रकरण अजून ताजं असताना आता संत बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणारा आणखी एक भोंदूबाबा इंदापूर तालुक्यात नावारूपाला येत असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या आहेत. हा बाबा संत बाळूमामाचा अवतार आणि बाळू मामा अंगात येत असल्याचं सांगून अनेक लोकांना लाखोंचा गंडा घालत असल्याचा आरोप होत असून, जमीर दाऊत शेख (जंक्शन, ता. इंदापूर) असं या बाबाचं नाव आहे. जमीर शेख रेडणीमध्ये (ता. इंदापूर) ‘दादा सैलानी’ नावाचे चिकन शॉप चालवतो.
जादूटोणा आणि अनिष्ट पूजाअर्चेच्या माध्यमातून लोकांची भूतबाधा, करणी, भानामती काढण्याचा दावा करून हा स्वयंघोषित बाबा अनेकांना लाखोंचा गंडा घालत असल्याचा व अनेकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करमाळा तालुक्यातील भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केला आहे. या भोंदूबाबाने ‘बाळूमामाच्या नावाचं चांगभलं’ ही मालिका सुरू झाल्यानंतर आपल्या अंगात संत बाळूमामा येत असल्याचा व आपण त्यांचा अवतार असल्याचा दावा केल्याचे उत्तरेश्वर कांबळे यांनी म्हटले आहे. मात्र, या भोंदूबाबाने याआधी करमाळा तालुक्यातही अनेक ठिकाणी येऊन आपल्या अंगात सैलानी बाबा, मिरावली बाबा येत असल्याचा दावा करून अनेकांना फसवल्याचा आरोपही उत्तरेश्वर कांबळे यांनी केला आहे.
सध्या कळस हद्दीतील वर्ग दोनच्या शासकीय जागेत ‘संत बाळूमामा आध्यात्मिक तळ’ या नावाने या बाबाच्या मठाचे बेकायदेशीर काम सुरू असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन या भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कांबळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या प्रकरणाची माहिती कांबळे यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तहसीलदार इंदापूर आणि वालचंदनगर पोलीसांनाही दिली आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातून अद्याप या व्यक्तीवर कोणतेही आरोप झाल्याची बाब समोर आलेली नाही. मात्र, होत असलेल्या आरोपांची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन या प्रकरणाची सत्यता तपासणे गरजेचे आहे. अन्यथा श्रद्धेच्या नावाखाली अनेकांना गंडवण्याचे, खंडणीचे आणि बलात्काराचे अनेक आरोप झालेल्या मनोहरमामा सारख्या प्रकरणांची पुनरावृत्ती होतच राहील.