कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅकसिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
यासंदर्भात अशी माहिती मिळते आहे की,केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.सूत्रांच्या मते, ज्या मुलांना दमा वगैरे समस्या आहेत त्यांचे लसीकरण हे आधी करण्यात येऊ शकते.ही लस सरकारी ठिकाणी मोफत दिली जाईल.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यांमध्ये प्रौढ नागरिकांप्रमाणेच वय वर्ष 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस मोफत दिली जाणार आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटे आधी दिलासादायक बातमी: मुलांसाठी कोव्हॅकसिन लसीला मंजुरी दिल्याने ही खूप दिलासा देणारी बाब ठरली आहे. कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक त्रास होईल असे म्हटले जात आहे. परंतु जर त्यापूर्वी मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळू लागली तर संसर्ग कमी होण्याची शक्यता अधिक आहे.
भारतात सध्या 18 वर्षावरील वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्या जात आहेत.भारतात आतापर्यंत 95 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.