जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो. 7776027968
दौंड : मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडील तुटीचा खोऱ्यात वळविण्यात यावे तसेच चिबाड, क्षारयुक्त शेतजमिनींच्या प्रश्नांबाबत धोरण आखावे अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंघ शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.
जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी धरण प्रकल्प व कोयना प्रकल्पामुळे नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे सुमारे १०० टीएमसी पाणी कृत्रिमरित्या पश्चिमेकडे वळविण्यात आले आहे, नैसर्गिकरित्या पूर्वेकडील असलेले पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडे वळविल्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे व नैसर्गिकरित्या पूर्वमुखी असणारे पाणी कमी झाल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होऊन नैसर्गिक असमतोल होत आहे. तसेच शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा दूरगामी विपरीत परिणाम झाला असून, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पडणारे दुष्काळ हि त्याची परिणिती आहे हि बाब आमदार अॅड. कुल यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंघ शेखावत यांच्या निदर्शनास आणून दिली असून त्याबाबत धोरण ठरविण्यासाठी बैठक घेण्याची विनंती देखील यावेळी केली.
तसेच शेतीसाठी पाण्याच्या अमर्याद वापर, क्षारयुक्त पाण्याचा वापर, कालव्यातुन होणार पाण्याचा निचरा, अतिक्रमणांमुळे नैसर्गिक ओढे, नाले यांच्या प्रवाहात होणार अडथळा, पूर स्थिती, रासायनिक खतांचा अति वापर आदींद्वारे जमीन पाणथळ, क्षारपड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये चिबाड, क्षारयुक्त तसेच पाणथळ शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यासंदर्भांत चिबाड शेतजमिन निर्मूलन, पृष्ठभागावर व भुपृष्ठभागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे संदर्भात एकात्मिक धोरण आखावे तसेच राज्यातील चिबड, पाणथळ झालेल्या जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात यावा अशी विनंती देखील आमदार अॅड. कुल यांनी यावेळी मंत्री गजेंद्र सिंघ शेखावत यांचेकडे केली आहे.
आमदार अॅड. कुल यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मंत्री गजेंद्र सिंघ शेखावत यांनी दिले.