मालोजीराजे स्मारकासाठी सुधारित रु. 50 कोटींच्या आराखड्यास मंजुरी द्यावी – हर्षवर्धन पाटील
– जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मागणी
इंदापूर :प्रतिनिधी दि.10/1/24
वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहरातील गढी महाराष्ट्राची अस्मिता असून, हे मालोजीराजांचे स्मारक भव्य व दिव्य असे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी त्यामध्ये इतर बाबींचा समावेश करून सुधारित रु. 50 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी द्यावी. तसेच मालोजीराजे स्मारक व हजरत चाँद शाहवली बाबा दर्गाहच्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.10) केली.
पुणे जिल्हा नियोजन मंडळाची ऑनलाईन बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षखाली बुधवारी संपन्न झाली. सदर बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी वीरश्री मालोजीराजे स्मारकासह इतर विकास कामांबाबत सूचना केल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा असलेले मालोजीराजेंची गढी हे राष्ट्रीय स्मारक होणे गरजेचे आहे. मालोजीराजेंच्या स्मारकाचा सध्या तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये इतर विकास कामे समाविष्ट करून सुधारित 50 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजूर मिळावी, अशी मागणी या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केली. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे मालोजीराजे स्मारकासाठी सुधारित 50 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर होण्याची चिन्हे दिसत आहेत.