इंदापूर: गेल्या आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथील दलित सुधार योजना अंतर्गत गटारी कामांमध्ये गैरव्यवहार झालेला असून सरपंचांवर रितसर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक तक्रारदारांनी केली होती. मुळात दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत आलेल्या निधीचा योग्य वापर झाला नाही असेच एकंदरीत या तक्रारदाराचे म्हणणे होते.प्रसारमाध्यमांमध्ये या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्यास अनुसरून माळवाडीच्या विद्यमान सरपंच मंगल व्यवहारे यांनी स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप फेटाळून लावत आपले म्हणणे गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडले. आज पंचायत समिती इंदापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी गावात झालेला सर्व प्रकार व आपल्यावर होत असलेले आरोप याबद्दल खुलासा केला यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामध्ये १) आमच्यावर झालेले आरोप खोटे व राजकीय सुडबुद्धीने झालेले आहेत.२) वास्तविक पहाता तक्रारदार यांनी सदर काम चालू असताना तक्रार करणे आवश्यक होते परंतु तसे न करता कामपूर्ण झाल्यावरती सुडबुद्धीने तक्रार केली आहे.३) मुळात १० लाख रुपये निधी दलितवस्ती साठी प्राप्त झाला होता तो निधी पारदर्शक पणे त्याच योजनेसाठी खर्च केला आहे.४) निधी खर्च करण्यापूर्वी शासनाच्या सर्व मान्यता घेऊन व संबधीत गावातील लोकांना कल्पना देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाप्रमाणे निधी खर्च केला आहे.५) सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर ज्या वस्तीमध्ये काम पूर्ण झाले आहे त्या वस्तीमधील ग्रामस्थाच्या पंचनाम्यावर पंच म्हणून सह्या घेतलेल्या आहेत.६ ) गावामध्ये विकासाची कामे होत असताना अॅक्ट्रासिटी दाखल करण्याची धमकी देऊन सुडबुद्धीने दहशद निर्माण करण्याचा हा प्रकार आहे.अशाप्रकारे खुलासा करत ग्रामपंचायतचे काम हे व्यवस्थित चालू असून काही दलित वस्तीच्या भागांमध्ये गटारीचे आउट सोर्स उपलब्ध नसल्याने व स्थानिकांनी अडथळा निर्माण केल्याने तेथील गटारीचे काम बाकी आहे लवकरच आम्ही या संबंधित वरिष्ठांशी बैठक लावून आम्ही हा सुद्धा प्रश्न निकाली काढणार आहोत असं सरपंच मंगल व्यवहारे म्हणाल्या.
“मुळात माळवाडी मध्ये दलित समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे व आलेला निधीमध्ये संपूर्ण दलित वस्तीचे गटार योजना पूर्ण करणे शक्य नाही. काही प्रमाणात निधी शिल्लक सुद्धा आहे परंतु स्थानिकांच्या अडवणुकीमुळे हा निधी वापरता येत नाही. आम्ही आमदार दत्तात्रय भरणे यांना आणखी निधीची मागणी केलेली आहे व सदर बाब आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षात घेऊन लागेल तेवढा निधी देण्यास तयार आहे असेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता गटारीच्या आउटलेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर गावाचा हा विषय कायमचा संपेल” असेही सरपंच मंगल व्यवहारे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की,”भविष्यात दलित वस्तीच्या सुधारणेसाठी लागेल ती मदत व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामार्फत लागेल एवढा निधी आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” असेही सरपंच मंगल व्यवहारे म्हणाल्या.