मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांना यश – अँड. शरद जामदार
इंदापूर : वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप नेते हर्षवर्धन पाटील मुंबईत दि. 25 मार्च 2023 रोजी भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाही सुरू होऊन महायुती सरकारने मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चाँद शाहवली बाबा दर्गाहच्या विकास आराखड्यासाठी सुमारे रू. 38 कोटीच्या निधीस मान्यता दिली. मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी हर्षवर्धन पाटील यांनी गेली 10 महिन्यांपासूनच्या केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी इंदापूर येथे शुक्रवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिली.
ऐतिहासिक असलेल्या मालोजीराजेंच्या गढी मध्ये न्यायालय, तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन आदी अनेक शासकीय कार्यालये होती. सदरच्या सर्व कार्यालयांसाठी भव्य प्रशासकीय इमारत असावी याचे नियोजन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदावर असताना केले व सद्याची भव्य प्रशासकीय इमारत उभी राहिली. मध्यंतरी न्यायालयीन इमारतीचे काम सुरू झाल्याने पुन्हा न्यायालयाचे कामकाज गढी मधून सुरु होते. या गढी मधून सर्व कार्यालये ही प्रशासकीय इमारतीत गेल्याने, गढी संवर्धनाची कल्पनाबरोबर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मांडली व त्यासाठी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केल्याने त्यास यश मिळाले आहे, असे यावेळी अँड. जामदार यांनी स्पष्ट केले.यावेळी अँड शरद जामदार यांनी मालोजीराजे गढी संवर्धनासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याचा संपूर्ण घटनाक्रम हा कागदपत्रांसह पत्रकारांना दाखविला.
इंदापूर येथे भाग्यश्री बंगल्यावरती फेब्रुवारी 23 मध्ये इंदापूर शहरातील शिवभक्तांची हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी गढी संवर्धन व स्मारक उभारणे संदर्भात चर्चा झाली. तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना भेटून निधी आणण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांनी घेतली. हर्षवर्धन पाटील यांनी सदरची बैठक भाग्यश्री बंगल्यावरती घेतल्यानंतरच मालोजीराची गढी संवर्धन कामास गती मिळाली. दरम्यानच्या काळात हर्षवर्धन पाटील हे गढी संवर्धनासाठी प्रयत्न करतायेत व त्याचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना मिळत आहे, हे लक्षात आल्यावर काहींनी रातोरात इंदापुरातील काही जणांकडून गढीच्या इतिहासाची माहिती घेऊन विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला,असे अँड. जामदार यांनी यावेळी सांगितले.
अँड. जामदार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची हर्षवर्धन पाटील साहेब यांनी मुंबईत दि. 25 मार्च 2023 रोजी भेट घेऊन इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणी, हजरत चाँद शाहवली बाबा दर्गाह विकास आराखड्या बाबत चर्चा केली व पत्र दिले, असे ते म्हणाले.अँड. जामदार यांनी पुढे सांगितले की, हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांना दि.15 एप्रिल 2023 रोजी पत्र पाठवून या संदर्भातील सविस्तर अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्याचे सहाय्यक संचालक पर्यटन यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना दि. 2 मे 2023 रोजी पत्र पाठवून वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सविस्तर अंदाजपत्रक, आराखडे पर्यटन विभागाकडे सादर करण्याचे पत्र पाठविले. सदर पत्राची प्रत जिल्हा नियोजन अधिकारी पुणे यांनाही पर्यटन विभागाने पाठविली.ते पुढे म्हणाले, गढीचा क वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी सतत पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदुरकर यांनी 9 मे 23 रोजी मुख्याधिकारी इंदापूर यांना पत्र पाठवून क वर्ग दर्जासाठी प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिला. गढीचा जिल्हा नियोजन मंडळाकडे आराखडा पाठविण्यासाठी मोजणी व इतर कामांसाठी हर्षवर्धन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पाठपुरावा केला. जिल्हा प्रशासनाकडून आराखडा तयार करून निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने ” मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चाँद शहवली बाबा दर्गाह ” च्या विकास आराखड्यासाठी सुमारे रू. 38 कोटीच्या निधीस मान्यता दिली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते हर्षवर्धन पाटील व महायुती सरकारचे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहिर आभार मानण्यात येत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी याप्रसंगी सांगितले.याप्रसंगी इंदापूर शहरातील शिवप्रेमी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेकडून हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन!
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सलग 30 वर्षे खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देणे व जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 चा शेरा काढण्यासाठी शासन स्तरावर घेतलेल्या परिश्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी.डी. आण्णा पाटील हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सन 1995 पासून आज सन 2023 पर्यँत खंडकरी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोलाच्या सहकार्यासंदर्भातील शेकडो बैठकांचे व सर्व घटनांचे बी.डी. आण्णा पाटील हे साक्षीदार आहेत, असे भाजप तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी यावेळी स्पष्ट केले.