निराभिमा कारखाना आगामी गळीत हंगामात काटा पेमेंट करणार,ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरच- हर्षवर्धन पाटील

नीरा भीमा कारखाना आर्थिक अडचणीतून आता सुस्थितीत – हर्षवर्धन पाटील
– वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
– ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरच
इंदापूर: प्रतिनिधी दि.13/9/23
नीरा भिमा कारखाना आगामी सन 2023-24 च्या गळीत हंगामात काटा पेमेंट करणार आहे.या हंगामात कारखान्याने 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीमध्ये आला आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर आल्याने आगामी काळात निरा भिमाचा समावेश राज्यातील टॉप 10 कारखान्यामध्ये निश्चितपणे होईल, अशी स्पष्ट ग्वाही कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.13) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2022-23 ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 17 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरच अदा केला जाईल. कारखान्याचे भांडवल रु. 6 कोटी एवढे असताना सध्या कारखान्याची मालमत्ता तब्बल रु. 352 कोटीची झाली आहे. गत हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता देण्यास विलंब झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी दिलगिरी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारचे सहकार्य करीत आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची सध्याची प्रतिदिनी असलेली 30 हजार लि.ची क्षमता वाढून 1 लाख 5 हजार लि. होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. कारखान्याची आजची रौप्यमहोत्सवी म्हणजे 25 वी वार्षिक सभा आहे. या 25 वर्षामध्ये कारखान्यास सहकार्य करणारे सभासद, शेतकरी बांधव, हितचिंतक या सर्वांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. भाऊंनी कारखाना स्थापन करण्याची सूचना केली व आपण त्यास आपण सर्वांनी मूर्त रूप दिले. भाऊंनी घालून दिलेल्या संस्कारानुसारच आपली सर्वांची वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.कारखान्याचा 25 वर्षांच्या इतिहास पाहिला तर अनेक अडचणीवर आल्या. मात्र या अडचणींवर यशस्वीपणे मात करीत लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या कारखान्यामुळे अनेक संसार उभे राहिले, प्रगती झाली, याचा आनंद होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
गतवर्षीच्या सन 2022-23 च्या हंगामात 5,64,682 मे.टन ऊस गाळप केले व साखर उतारा 10.02 टक्के आला आहे. या हंगामात गाळप क्षमता 3500 मे.टन असताना कारखान्याने एका दिवसात 6000 मे.टन ऊस गाळपाचा उच्चांक केला. तर प्रतिदिनी सरासरी 5,230 मे.टन क्षमतेने हंगामात गाळप केले. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून 2 कोटी 60 लाख 15 हजार 655 युनिट वीज एक्सपोर्ट केली. त्याचबरोबर इथेनॉल चे 97 लाख 26 हजार 929 लि. उत्पादन निघाले. प्रतिदिनी इथेनॉल उत्पादन सरासरी उत्पादन 60 हजार 688 लि. एवढे निघाले. तर बायोगॅस प्रकल्पामुळे 3578 मे.टन बगॅसची बचत झाली. सेंद्रिय खत प्रकल्पातून 16207 बॅगांची विक्री करण्यात आली. बायोकंपोस्ट प्रकल्पातून 5315 मे.टन बायो-कंपोस्ट खताची शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली. डिझेल व पेट्रोल पंप विक्रीतून 7 कोटीची उलाढाल झाली आहे. कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट 23 पर्यंतचा पगार झाला असून, कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस दिला जाईल, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रारंभी श्रद्धांजली ठराव कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी मांडला. त्यानंतर सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या सभेमध्ये कारखान्यास एनसीडीसीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळाचे सहकार्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव गोविंदराव रणवरे यांनी मांडला, त्यास तानाजीराव नाईक यांनी अनुमोदन दिले. या सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, तानाजीराव हांगे, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, किरण पाटील, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार व मान्यवर उपस्थित होते. सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. आभार संचालक प्रतापराव पाटील यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here