• इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांनी दि.7 रोजी घेतली शिवप्रेमींची बैठक.
• हर्षवर्धन पाटील यांची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेशी दि.9 रोजी मंत्रालयात चर्चा. • भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
इंदापूर : प्रतिनिधी दि.16 मार्च
इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार संवर्धन करणार आहे, अशी घोषणा भाजप नेते व राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी विधिमंडळामध्ये केली. शिवसेना-भाजप युती सरकारने मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेबद्दल इंदापूर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
इंदापूर येथे मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन होऊन तेथे स्मारक व्हावे या संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे भाग्यश्री बंगला येथे शिवप्रेमींची दहा दिवसांपूर्वी मंगळवार दि. 7 मार्च रोजी बैठक घेतली होती. सदर बैठकीत राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्याने आता गढीचे संवर्धन व स्मारक करणेचा विषय मार्गी लागणार असून, सदर कामांसाठी सुमारे रु. 10 कोटी निधी लागेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच शिष्टमंडळ घेऊन सांस्कृतिक व इतर मंत्र्यांना भेटण्याचे व मंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे यावेळी बैठकीत ठरविण्यात आले. सदर बैठकीला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.त्यानंतर मुंबईत मंत्रालयामध्ये गुरुवारी (दि.9 मार्च) हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शिवसेना-भाजप युती सरकार कडून गढीचे संवर्धन, मालोजीराजांचे स्मारक उभारणे, इंदापूर शहरातील ऐतिहासिक विविध ठिकाणांचे संगोपन करणे, ऐतिहासिक स्थळ असलेला रामेश्वर नाका, ऐतिहासिक भार्गवराम तलाव सुधारणा करणे, इंदापूर शहरातील विविध ठिकाणची जुनी ऐतिहासिक शिल्पे संरक्षित करणे या विषयांवरती सविस्तरपणे चर्चा केली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन करणे व त्यासाठी निधी देणेस शिवसेना-भाजप युती सरकार कटिबद्ध असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचेशी चर्चेत नमूद केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन राज्यात काम करीत असल्याने वीरश्री मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन, स्मारक करण्यासंदर्भात शिवसेना-भाजपचे सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी स्पष्ट केले.
Home Uncategorized मालोजीराजेंच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार करणार संवर्धन.इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांनी दि.7 रोजी...