शेतकऱ्यांना महावितरणचा ४४० चा झटका… कोणतीही पूर्व थकबाकीची नोटीस न देताच रोहित्र बंद.कोणताच पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने नाही..?

इंदापूर: (उपसंपादक:संतोष तावरे) सध्या रब्बीचे पिके अगदी जोरदार आली असून, काढणीच्या अंतिम टप्प्यावर पिके असतानाच महावितरण कंपनीने कोणतीही नोटीस न देताच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून शेतकऱ्यांना मात्र ४४० चा झटका बसला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पिकांच्या मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते, हाता तोंडाशी आलेली पिके वाहून गेली तर अनेक पिके शेतात साचलेल्या पाण्यात सडून गेली होती, मात्र तरीही आर्थिक संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या आहेत. परंतु त्यातच आता महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे हात धुवूनच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी देखील खूप संतापलेले दिसून येत आहेत. शेतकरी रात्रीचे जीवाची परवा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना साप ,विंचू , तसेच जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून रब्बी पिके जगण्यासाठी धडपड करीत आहेत .कंपनी कारखाने यांना २४ तास वीज पुरवठा होत आहे .परंतु साऱ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मात्र २४ तास का लाईट नाही असा सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे. शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, महावितरण कडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडण्याच्या अगोदर ५६ (१) ची नोटीस देणे बंधनकारक असते परंतु महावितरण कंपनी तसे नोटीस देताना दिसून येत नसून सर्रासपणे शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडताना दिसत आहे हे गैर आहे. सरकार शेतीमालाच्या उत्पादन खर्चात विज बिल धरत नाही हे सरकारला माहीत आहे म्हणून तर वीज कायदा २००३ च्या कलम ६५ प्रमाणे कृषी धारकांना अनुदान देत आहे, हे अनुदान वीज वापराच्या दुप्पट दिले जाते ही माहिती अधिकारात सिद्ध झाले आहे. तसेच जनहित याचिका ५४६| २०१० व ८६५१| २०२० मध्ये निर्णय शेतकऱ्यांच्याद बाजूने आहेत. शेतकऱ्यांना वीज कायदा २००३ च्या कलम ५६(१) ची नोटीस द्या असे आदेश झाले आहेत. तसेच जनहित याचिका ४४/ २०१२ मध्ये ७ फेब्रुवारी २०१३ च्या प्रतिज्ञापत्रात वाणिज्य विभाग प्रमुख मु. स. केळे यांनी वीज पुरवठा खंडित करणार नाही असे सांगितले आहे. तसेच अन्न आयोगानेही बीज पुरवठा खंडित करू नका असे सांगितले आहे. आता कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नाही. आपले प्रश्न आपणास सोडवले पाहिजे असे पांडुरंग रायते म्हणाले व ज्या शेतकऱ्यांचे डीपी महावितरण कंपनीने बंद केले आहेत त्या शेतकऱ्यांनी थेट शेतकरी संघटनेशी दिलेल्या नंबर वर संपर्क साधण्याचे आव्हान देखील शेतकरी संघटने कडून केले गेले आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते ९८८१६७९५१७ ,सचिन कोथमिरे ९९७०४७०२४३ , हनुमंत वीर ९८२३३२८२२५ या नंबर वर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा .शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा सुरळीत करून देईल असेही शेतकरी संघटने कडून सांगितले गेले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here