कालच आदित्य ठाकरे यांनी आपण ठाण्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवू अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. यातूनच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेचे हे एक प्रकारे रणसिंगच त्यांनी फुंकले आहे असे म्हणता येईल.
परंतु ही विधानसभा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपी नाही कारण आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून त्यांच्याच घरातील निहार ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना हे एक मोठा आव्हान असणार आहे.आदित्य ठाकरे यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू निहार ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची खेळी शिंदे गटाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. निहार ठाकरे हे राजकारणात नवखे आहेत.त्यांचं अचानक नाव पुढे आल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. निहार यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतरच निहार ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे निहार हे चिरंजीव आहेत. बिंदुमाधव यांचा 1996 मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. निहार ठाकरे आतापर्यंत राजकारणापासून दूर होते. बिंदूमाधव ठाकरे यांचे ते चिरंजीव असल्याने व बिंदूमाधव ठाकरे दिवंगत झाल्याने त्यांना आजही सहानुभूती प्रचंड प्रमाणात आहे.निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस करतात. निहार हे राजकीय कायदेशीर सल्लागार, कार्पोरेट व्यवहाराच्या कागदपत्रांची ड्राफ्टिंग करणे, देशांतर्गत आणि बहुराष्ट्रीय कार्पोरेट ग्राहकांमध्ये तडजोडी करणे आदी कामे ते करतात.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा निहार ठाकरे यांच्याशी विवाह झाला आहे. अंकिता पाटील-ठाकरे या राजकारणात सक्रिय असून आपले वडील हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अनेक राजकीय धडे त्यांनी शिकलेले आहेत आणि याचाच काही प्रमाणात का होईना फायदा निहार ठाकरे यांच्या राजकीय जीवनाला होणार असेही बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात निहार यांची महाराष्ट्रातील राजकारणात ग्रँड एन्ट्री होऊ शकते आणि यातूनच केवळ आदित्य ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच महिन्यापूर्वी स्वतः निहार ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते की”सध्या तरी राजकारणात येणाचा कोणताही विचार नाही. पण येणार नाही असंही मी म्हणत नाही. जर राजकारणात आलोच तर बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन करीत भविष्यात राजकीय प्रवेशाचे संकेत दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात त्यांनी शिंदे गटासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यामुळे निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर भविष्यात राजकीय मैदानात दिसण्याची शक्यता आहे.