केंद्र सरकारचा शेती उद्योगाला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प – हर्षवर्धन पाटील

🎋 साखर उद्योग आयकरातून कायमचा मुक्त
शेती क्षेत्राला भरभरून देणारा अर्थसंकल्प
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने शेती, शेतकरी व शेतीपूरक प्रक्रिया उद्योग आणि साखर कारखान्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती उद्योगाला प्रोत्साहन देणारे अनेक दिलासादायक निर्णय घेतले आहेत. शेती क्षेत्राला भरभरून देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नमूद करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अर्थसंकल्पाचे बुधवारी (दि.1) स्वागत केले. साखर उद्योग आयकरातून कायमचा मुक्त करणेसाठी अर्थसंकल्पामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, साखर कारखान्यांकडून केंद्र सरकारला देय असलेल्या प्राप्तीकराच्या रु.10 हजार कोटी रक्कमेला अर्थसंकल्पामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे सुमारे 8500 कोटी रुपये वाचणार आहेत. साखर उद्योग आयकर मुक्त केलेबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. तसेच अर्थसंकल्पात कृषी कर्ज पुरवठ्यात वाढ करून, तब्बल रु. 20 लाख कोटीचा कृषी कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. तर रु. 2516 कोटींची गुंतवणूक करून प्राथमिक सहकारी संस्था स्थापन साठवणुकीचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहेत.
देशातील 63 हजार प्राथमिक संस्थांचे संगणीकरण होणार असून, भरड धान्यासाठी हब निर्माण करून त्यास श्री अन्न हे नाव देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्याचा तसेच देशातील मत्स्यपालन, मासेमारीसाठी रु. 6000 कोटीची भरीव तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा इंदापूर तालुक्याला होणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच देशात नवीन संकल्पना रूढ होत असलेल्या नैसर्गिक शेतीसाठी एकूण 1 कोटी शेतकऱ्यांना सर्वतोपरी साह्य करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. भाजप सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प शेती क्षेत्रासाठी भरघोस आर्थिक तरतूद केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here