👉 हभप भरत महाराज शिंदे यांचे गौरवोद्गार.
शहाजीनगर: एकीकडे चौका-चौकात बसणाऱ्या गणपतींची संख्या वाढत असतानाच इकडे दुसरीकडे मोरया ग्रुपने ‘एक गाव – एक गणपती’ ची संकल्पना जोपासत आजूबाजूच्या गावांपुढे एक आदर्श उभा केला आहे. मोरया ग्रुपचे हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीज मधील बाळासाहेब फेम हभप भरत महाराज शिंदे यांनी व्यक्त केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील मोरया ग्रुपने रविवारी (दि.११) संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कीर्तनसेवेसाठी संत तुकाराम महाराजांच्या
“भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास।
गेले आशापाश निवारूनि ॥
विषय तो त्यांचा झाला नारायण।
नावडे धन जन माता पिता ॥
निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें।
कांहीं च सांकडें पडों नेदी ॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे
घातलिया भये नरका जाणें ॥” या अभंगाची निवड केली होती.आपल्या हातून चांगले कार्य व्हावे या हेतूने परमेश्वराने आपल्याला मानवाचा जन्म दिला आहे. मानव जन्माला येऊन परमेश्वराचे नामचिंतन न करणे यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. परमेश्वराने आपल्याला भरभरून दिले आहे, त्यामुळे परमेश्वराचे नामचिंतन करताना कशाचीही तमा बाळगण्याची गरज नाही. आत्मिक सुख आणि मानसिक समाधान मिळवायचे असेल तर अखंड हरिनामाशिवाय पर्याय नसल्याचे मत हभप शिंदे महाराजांनी व्यक्त केले. कीर्तनासाठी स्वररत्न आकाश महाराज गरगडे, मृदुंगाचार्य ऋतिक महाराज पवार व सराफवाडीच्या भजनी मंडळाने साथ दिली.
मोरया ग्रुप तर्फे यापुढेही असेच प्रबोधनात्मक व मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मोरया ग्रुपने दिली आहे. तन, मन आणि धनाने मोरया ग्रुपला सहकार्य करणाऱ्यांचे आभार मोरया ग्रुपने मानले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त, नागरिक, युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
👉 महाराज, कीर्तन आणि पाऊस फक्त योगायोग:
महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन गणेशोत्सवाच्या दरम्यानच केले होते मात्र ऐनवेळी पावसाने लावलेली हजेरीमुळे कीर्तन स्थगित करण्यात आले होते. तेच कीर्तन रविवारी झाले आणि यावेळीही पावसाने उपस्थिती लावताच “माझं कीर्तन आणि पाऊस हा फक्त योगायोग” असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.