बावडा प्रतिनिधी: अक्षय खरात
इंदापूर तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून चोरांकडून ही चोरी करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब होताना दिसत आहे. चोरीचा असाच प्रकार बावडा परिसरात पाहावयास मिळत आहे. वीज वाहक, केबल, स्टार्टर तसेच विद्युत पंप चोरीच्या घटना या परिसरात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. चोरलेला केबल मधील तांब्याच्या तारा काढून तालुक्यातील तसेच तालुका बाहेरील भंगार दुकानदारांना विकण्याचा गोरखधंदा या चोरट्यांकडून राजरोसपणे चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे अगोदरच अडचणीत असणारा शेतकरी राजा आणखीन अडचणीत सापडला असून या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
मागील पाच सहा महिन्यापासून अशा घटना घडण्याचे प्रमाण या परिसरात वाढले आहे. बावडा पोलीस स्टेशनमध्ये अशा अनेक तक्रारी दाखल आहेत. परंतु आजपर्यंत या गोष्टीकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहिल्याचे दिसून येत नाही. तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तक्रारीची पोहोच दिली जात नसल्याचे शेतकरी संघर्ष समिती यांनी दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाचा दबदबा व जरब दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. यासर्व प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.केबल चोरीबाबत कारवाई करावी अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करुन निषेध मोर्चा करावा लागेल असा इशारा देण्यात आला. सदरचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पंडीतराव पाटील, धैर्यशील पाटील पवन घोगरे शशिकांत आगलावे सचिन सावंत विजय गायकवाड सुरेश शिंदे विजय घोगरे तुकाराम घोगरे, मुण्णुस मुलानी यांनी दिले.