अमरावती : आजपर्यंत तुम्ही अनेक लव्हस्टोरी पाहिल्या असतील, वाचल्या असतील मात्र अमरावतीतली ही भन्नाट लव्हस्टोरी एकदा वाचाच.त्याच झालं असं अमरावतीत सरपंच आणि उपसरपंच यांनीच लगीनगाठ बांधल्याने सध्या याच लव्ह स्टोरीची हवा आहे. गावचा कारभार संभाळताना हा संसाराचा गाडा साधारण एक वर्षापूर्वीच त्यांच्यासाठी सुरू झालाय. तसं गावगाड्याचं राजकारण फार अवघड असतंय. मात्र आयुष्याच्या वाटेवर सरपंच आणि उपसरपंचांची कायमची युती झाल्याने ही वयक्तिक ग्रामपंचायत पाच वर्षांनी बरखास्त होणार नाही, एवढं मात्र नक्की. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत कांडली ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच आज 19 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले आहेत. या भागात या लग्नाची एवढी चर्चा आहे की, आजच्या फरहान आणि शिबानीच्या लग्नाचीही नसेल.
👉 गावगाड्याबरोबर संसाराचा गाडा
गावचा गाडा हाकताना संसाराचा गाडा सुरू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असले. पण ही कायमची युती झाली कशी याची स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. गेल्या एक वर्षापासून ते कांडली ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच मिळून एकत्रित काम करीत आहेत. विवाह बंधनाच्या निर्णयाने कांडली ग्रामपंचायतवर पती-पत्नीची एकहाती सत्ता कांडलीवासीयांसह तालुक्याला बघायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच बनणे. वर्षभर एकत्रित काम करणे. नंतर विवाह बंधनात अडकून परत एकहाती सत्ता ग्रामपंचायतीवर गाजविणारे हे भावी दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील पहिले दाम्पत्य ठरले आहे.
👉 धाडसी निर्णयामुळे जोडपं चर्चेत
कांडली ग्रामपंचायत निवडणुकीत सविता आहाके आणि दिलीप धंडारे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 2020-21 मध्ये सविता आहाके सरपंचपदी तर दिलीप धंडारे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रामपंचायत क्षेत्रातून दारूची दुकाने, गॅस गोडाऊन हद्दपार करणे, वीज वितरण कंपनीवर कर आकारणे यासाठी सरपंच, उपसरपंचाची जोडी तालुक्यात चर्चेत राहिली. विवाहाप्रीत्यर्थ निमंत्रण पत्रिकेवर त्यांनी शिवाजी महाराजांना मानाचे स्थान दिले आहे. शिवजयंतीदिनी हा विवाह संपन्न झाला आहे. त्यामुळे या अनोख्या राजकीय लव्ह स्टोरीची सध्या जोरदार चर्चा आहे.
Home Uncategorized गावातील सरपंच यांनी केला उपसरपंच यांच्यासोबत विवाह, गावगाडा चालवण्याबरोबरच आता चालवणार...