👉 बिबट्या सदृश प्राणाने वासरू व दोन शेळ्या फस्त करमाळा तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत..
करमाळा तालुका प्रतिनिधी: देवा कदम
करमाळा -तालुक्यातील कात्रज येथे किशोर पाटील या शेतकऱ्याचे वासरू व शंकर लकडे या शेतकऱ्याच्या दोन शेळ्या बिबट्या सदृश प्राण्याने जागीच फस्त केल्याची घटना मंगळवार दिनांक 8 रोजी पहाटे घडली. किशोर पाटील सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.दुपारी 3 वाजता शंकर लकडे शेतात गेले असता अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला.आवाज का येतो हे पाहण्यासाठी शंकर लकडे गेले असता दोन शेळ्या मृतावस्थेत दिसल्या. काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या भीतीने हा परिसर घाबरून गेला होता आणि पुन्हा एकदा बिबट्या सदृश प्राणी आढळून आला आहे.त्यामुळे कात्रज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच हा परिसर उजनी क्षेत्रात येत असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.साखर कारखान्याचा गाळप हंगाम चालू आहे. परंतु बिबट्या सदृश्य प्राण्यामुळे ऊस तोडणी कामगारांवर भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम ऊसतोडणी कामगारांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या परिसरात 50 टक्क्यांपेक्षा जास्त ऊस अजूनही शेतात उभा आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी आदिनाथ कारखान्याचे संचालक किरण कवडे यांनी केली आहे. त्यापूर्वी सोमवार दिनांक 7 रोजी उंदरगाव येथे बिबट्या सदृश्य प्राण्यांचे चित्र निदर्शनात आले आहे. तेथील क्षेत्राची वन खात्याने पाहणी केली असून या शेतामध्ये जे ठसे आहेत ते बिबट्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे.नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक तपासणीसाठी वरिष्ठाकडे पाठविण्यात आले आहे. तर कात्रज येथील दोन्ही घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तेथील 35 किलो वजनाचे वासरू हाडामासासहित फस्त करण्यात आले आहे.बिबट्या एका वेळेस 10किलो पेक्षा जास्त मांस भक्षण करत नाही. त्यामुळे बिबट्या सोडून इतर प्राण्यांनी वासरु खाण्याची शक्यता आहे अशी माहिती नारायण चव्हाण वनमजूर करमाळा वन विभाग यांनी दिली.