बारामती विशेष प्रतिनिधी:संदीप आढाव
बारामती : कुटुंबातील महिला ही सैतानाचा अवतार असल्याचे समजत नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बरामतीमध्ये घडली. महिलेच्या कुटुंबीयांनी मांत्रिकाच्या सल्ल्याने हा अघोरी प्रकार केला.
बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील ही घटना आहे. या प्रकरणी मांत्रिकासह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.
महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड, नीता अनिल जाधव आणि तात्या नावाचा मंत्रिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. करंजेपुल येथे राहणाऱ्या महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..
हुंडा दिला नाही म्हणून छळ करायचे:-
दाखल तक्रारीनुसार या महिलेला लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात होता. हुंडा दिला नाही म्हणून तिचा छळ करण्यात यायचा. त्यानंतर दोन्ही दिराने आणि सासूने भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलवले. त्याने सांगितल्यानुसार आरोपीकडून लिंबू उतरवणे अंग धुपारे टाकणे, भस्म लावणे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले.
रिंगण तयार करून महिलेला नग्न करुन बसवण्यात आले:-
कुटुंबीयांनी तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुंकवाचे रिंगण तयार करून त्यात महिलेला नग्न करुन बसवण्यात आले. तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला दाबून ठेवलं गेलं. हा प्रकार पती आणि मुलाला सांगितला तर तुला ठार मारू अशी धमकीदेखील महिलेला देण्यात आली.
शेजारी राहणाऱ्या लोकांनी महिलेची सुटका केली:-
मात्र, अचानकपणे महिलेच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजारी थोडे घाबरले. नंतर महिलेच्या घराकडे धाव घेत शेजाऱ्यांनी पीडित महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेने ही घटना आई-वडिलांना आपल्या माहेरी कळवली. महिलेच्या आई-वडिलांनी बारामतीत येत सासरच्या लोकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, महिलेला नग्न करुन तिचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करवी अशी मागणी करण्यात येत आहे.