बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यात सावकारी प्रकरणाच्या दाखल गुन्ह्यात मदतीसाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार संदीपान माळी याला अटक करण्यात आली आहे.40 हजारांपैकी 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, या घटनेमुळे बारामती शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सावकारी कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठवताना आपल्या बाजूने पाठवण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडे संदिपान माळी याने 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. त्यानुसार या प्रकरणात तडजोड करून 30 हजार रुपये स्वीकारताना संदिपान माळी याला रंगेहाथ पकडण्यात आले.