वालचंदनगर : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी (ता.इंदापूर) जवळील नीरा डाव्या कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्यात पडलेल्या दोन वर्षाच्या शौर्य पांडुरंग चव्हाण चिमुरड्याला समर्थ बापूराव शिंदे या बारा वर्षाच्या तरुणाने पाण्याबाहेर काढून चिमुरड्याचा जीव वाचविला.
नीरा डाव्या कालव्यातून खरीपातील पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. नीरा डाव्या कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडण्यात आले आहे. उदमाईवाडी गावाजवळून रस्त्यालगत वितरिका वाहत आहे. वितरिकेजवळच पांडुरंग चव्हाण यांचे घर आहे. बुधवार (ता.१५) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शौर्य चव्हाण व त्याचा अडीच वर्षाचा चुलत भाऊ कृष्णा चव्हाण खेळत खेळत वितरिकेच्या जवळ गेले होते. अचानक शौर्यचा पाय घसरल्याने शौर्य वितरिकेच्या पाण्यात पडला.
चिमुरड्या कृष्णाने ही पळत घरी जावून घरातील नागरिकांना शौर्य पाण्यात पडला असल्याची घटना सांगितली. घरातील नागरिकांनी वितरिकेकडे धूम ठोकली. यावेळी वितरिकेजवळून इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारा समर्थ शिंदे हा तरुण व्यायामासाठी चालला होता.त्याला वितरिकेच्या पाण्यामधून काय तरी वाहत असल्याचे दिसले होते.मात्र त्याने सुरवातीला दुर्लक्ष केले. मात्र नागरिकांच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता वितरिकेमध्ये उडी टाकून शौर्यला पाण्यातून अलगद बाहेर काढले. शौर्य सुखरूप असल्याचे पाहून आई प्रांजली व वडिल पांडुरंग यांचा आनंद गगणामध्ये मावेनासा झाला होता. त्यांनी समर्थ शिंदे या तरुणाचा आभार मानले. समर्थच्या समयसुचका व तत्परतेमुळे एका चिमुरड्याचा जीव वाचला असून त्याच्या धाडसाचे कौतुक होवू लागले आहे.