शेतकरी विरोधी कायद्याचा वनवा महाराष्ट्रभर पेटणार.सांगलीमध्ये पडली पहिली ठिणगी.
सांगली:(उपसंपादक संतोष तावरे यांच्याकडून) केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, शेतकरी विरोधी कायद्यामुळेच शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.हे सरकारच शेतकऱ्यांची हत्या करत आहे असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सांगलीत शेतकरी मेळाव्यामध्ये केला. यातूनच शेतकरी विरोधी कायद्याची पहिली ठिणगी पडली म्हणत आणि त्याचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे असे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले.शेतकरी विरोधी कायद्याची येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी होळी केली जाणार असल्याचेही रघुनाथ दादा यांनी सांगितले. शेती विषयक कायदे दुरुस्त करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी दिला.सांगली येथे विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजी नाना नांदखिले, मा. ,पांडुरंग रायते, इत्यादी शेकडो शेतकरी, संघटनेचे नेते, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .पुढे रघुनाथ दादा म्हणाले की,”शेतीमालाचा भाव का वाढत नाही? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शेतमालाचा भाव जाणीवपूर्वक पाडला जात आहे त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.कायद्यात दुरुस्ती झाली तर शेतीमालाचे भाव नक्की वाढतील. हे सर्व कायदे दुरुस्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकला पाहिजे ” असेही रघुनाथ दादा यांनी शेतकरी मेळाव्यामध्ये सांगितले. शिवाजी नाना नांदखिले म्हणाले की,”दोन साखर कारखान्यातील अंतराची अट वारंवार मागणी करून देखील का कमी केली जात नाही. साखरेला प्रदेशात प्रति किलो ५६ रुपये एवढा भाव आहे .पण भारतात ती फक्त ३५ रुपये किलो या कवडीमोल भावाने विकली जात आहे. अशावेळी निर्यात बंदी का लादली आहे असा टोला शिवाजी नाना नांदखिले केले यांनी लगावला. पुढे पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले की, २०१४ ,२०१९ ला जसे नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल म्हणून आपल्या सगळ्याला फसवलं, अगदी तसंच आत्ता बीआरएस आलय, तेलंगणा मॉडेल, तेही आपल्याला फसवायला लागलय, अशी चौफेर फटकेबाजी रायते यांनी सरकारवर व नवीन आलेल्या बीआरएस वर केली. या झालेल्या शेतकरी मेळाव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्येच शेतकरी विरोधी कायद्याची ठिणगी पडली असून, त्याचा वनवा सगळीकडेच पेटू लागला आहे. आणि जोपर्यंत शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये दुरुस्ती होऊ शकत नाही, तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकून सरकारला हे कायदे दुरुस्त करायला भाग पडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, जणू काय अशी शपथच मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी नेते, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यामध्ये घेतल्याचे दिसून आले.