मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्युझीलंडमधील दुसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस सनसनाटी ठरला.मूळचा मुंबईकर, मात्र न्युझीलंडकडून खेळणाऱ्या एजाज पटेल याने टीम इंडियाच्या सगळ्या 10 विकेट घेताना, इंग्लडचे जिम लेकर व भारताचा अनिल कुंबळे यांच्या पंक्तीत स्थान मिळविले..
इंग्लंडच्या जिम लेकर यांनी 1956मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेने 1999मध्ये पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताविरुद्ध खेळताना एजाजने 47.5 षटकांत 119 धावांत 10 विकेट्स घेतल्या.
कुंबळेकडून कौतुकाची थाप:
“परफेक्ट 10 क्लबमध्ये तुझं स्वागत..! चांगली गोलंदाजी केलीस. कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी करून एक वेगळं यश तू मिळवलंस..” अशा शब्दांत अनिल कुंबळे यांनीही ट्विट करीत एजाजचे कौतुक केलंय.
एजाज तसा मुळचा मुंबईकरच.. 1ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत जन्मलेला एजाज 8 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. त्याच्या वडिलांनी तिथे गॅरेज उभारलं. मुंबईत असताना एजाजची आई एका शाळेत शिक्षिका होत्या.
एजाजने सुरुवातीला वेगवान गोलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार तो डावखुरा फिरकी गोलंदाज बनला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने 3 वर्षांपूर्वी त्याला न्युझीलंडकडून खेळण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या कसोटीतच 7 विकेट्स घेताना तो ‘सामनावीरा’ ठरला होता.
एजाजच्या फिरकीपुढे टीम इंडियाचा डाव 325 धावांवर आटोपला. मयांक अग्रवालने शानदार 150 धावा केल्या, त्याला अक्षर पटलने (52) चांगली साथ दिली.
न्युझीलंडचा डाव गडगडला:
दरम्यान, न्युझीलंडच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा न्युझीलंडने 6 बाद 38 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराजने 3, तर अक्षर व अश्विनने,जयंत यादव प्रत्येकी 1 विकेट घेतली.