अहमदनगर : महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका घेऊन जात असलेल्या एका ट्रकला आग लागली. आगीत ट्रकमधील सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या.या प्रश्नपत्रिका पुणे विभागातील परीक्षा केंद्रांसाठी रवाना झाल्या होत्या. ट्रकला आग लागण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. ही दुर्घटना घडल्यामुळे बारावीचे दोन पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात बोर्डाने घेतला आहे.
५ मार्च आणि ७ मार्चला होणारे दोन पेपर बोर्डाने पुढे ढकलले आहेत. भाषा विषयाचे हे पेपर असून बोर्डाने हे पेपर पुढे ढकलले आहेत. या वर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असून ४ मार्च रोजी पहिला पेपर असणार आहे. तसेच शेवटचा पेपर ३० मार्च रोजी होणार आहे. एकूण २५ दिवस बारावीची ही परीक्षा होणार आहे. ५ मार्च आणि ७ मार्चला बारावीची भाषा विषयाची परीक्षा होणार होती. पण अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर ५ मार्च आणि ७ मार्चला असलेली बारावीची भाषा विषयाची परीक्षा पुढे ढकलली आहे.
पाच तारखेला हिंदी, जपान, जर्मनी, चिनी आणि पर्शियन भाषेचे पेपर होणार होते. आता ही परीक्षा थेट एक महिन्यानंतर ५ एप्रिल रोजी होणार आहे. ७ मार्च रोजी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, उर्दू, फ्रेंच, स्पॅनीश आणि पाली यांचे पेपर होणार होते. आता ही परीक्षा थेट एक महिन्यानंतर ७ एप्रिल रोजी होणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२वीच्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल करण्यात आले नाही असे बोर्डाने म्हटले आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच १०वी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असेही बोर्डाने म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ट्रकला आग लागली. आग लागल्यामुळे ट्रकमधील प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना सकाळी सात वाजता घडली. रस्त्यावरून जात असलेल्या ट्रकमधून धूर येऊ लागला. अखेर चालकाने ट्रक थांबवला. चालक आणि त्याचा सहकारी ट्रकमधून बाहेर पडले आणि त्यांनी वेगाने सुरक्षित अंतर गाठले. आग पसरली आणि ट्रकमधील प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. अग्नीशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी येऊन आग नियंत्रणात आणेपर्यंत अनेक प्रश्नपत्रिक जळून गेल्या होत्या. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.